अवघे ३९ वर्षांचे आयुष्य जगलेले स्वामी विवेकानंद यांनी ‘जीवनलीला’ संपवली तेव्हा त्यांच्या नावाचे, जीवनाचे, विचारांचे असलेले आकर्षण आजही तेवढेच आहे. त्यात काहीही फरक नाही. त्यामुळेच आधुनिक भारताच्या नवोत्थानात सहभागी झालेल्या लोकांनी विवेकानंदांकडून प्रेरणा घेतल्याचे दिसते. स्वामी विवेकानंद यांना कोणाचाच विरोध नाही, ते सर्वमान्य आहेत, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी केले. केशव भिकाजी ढवळे प्रकाशन संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद समग्र ग्रंथ खंड १ ते ७ च्या पाचव्या पुनर्मुद्रणाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ढवळे प्रकाशनाच्या कविता ढवळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त उपस्थित होते. त्याचबरोबर आयमस्ती डॉट कॉम या संकेतस्थळाचे प्रमुख समीर खांडवाला हेही उपस्थित होते.
आपल्या भाषणात भागवत पुढे म्हणाले की, अमेरिकेत त्यांनी ऐतिहासिक भाषण केले. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारतीयांचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. सगळ्या जगाचे लक्ष स्वामी विवेकानंदांनी भारताकडे वेधले. संकुचितपणाच्या भिंती पाडून एकमेकांच्या संबंधांकडे लक्ष द्या, उपभोगाच्या लालसेत वाहून जाऊ नका. तर त्यापलीकडील सत्याचा शोध घ्या. आपल्या ऐतिहासीक भाषणात धर्मातराला विरोध करीत विवेकानंदांनी जगाला ठणकावून सांगितले की, पुढील काळात भारत देशच जगाला शिकविणार आहे. किंबहुना जगाला तारण्याची क्षमता केवळ भारतातच आहे, असेही भागवत यांनी पुढे सांगितले.
स्वामी विवेकानंद समग्र ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे ढवळे प्रकाशनाने आयमस्ती डॉट कॉम या अमेरिकास्थित संकेतस्थळाच्या सहकार्याने या समग्र ग्रंथांच्या इ-बुकही तयार केले असून त्याचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजदत्त म्हणाले की, ‘बंधू आणि भगिनींनो’ या दोनच शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करीत स्वामी विवेकानंदांनी जगाला जिंकून घेतले. एक हजार वर्षांपासून गुलामगिरीत अडकलेल्या भारतीयांचा आपल्याच तत्वज्ञानावरचा विश्वास उडत चालला होता. त्यामुळे आपले स्वत्व खरेच काही नाही असे समाजमन तयार होत होते. ही सगळी जळमटे स्वामी विवेकानंदांनी झटकली, साक्षात्कार घडविला. म्हणूनच ढवळे प्रकाशनाने काढलेले हे स्वामी विवेकानंदांचे समग्र साहित्य आजच्या पिढीबरोबरच उद्याच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. इ बुक स्वरूपातील ग्रंथांमुळे विवेकानंदांचे विचार आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वदूर पोहोचविता येणार आहेत, ही सुद्धा चांगली बाब आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी आयमस्ती डॉट कॉमचे प्रमुख समीर खांडवाला यांनी इ-बुक म्हणजे काय, ते कसे वापरायचे, आयमस्ती डॉट कॉमचे वैशिष्टय़ याचे संगणकीय सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी ढवळे यांनी केले. प्रवरा जोशी यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
स्वामी विवेकानंद सर्वमान्य आहेत
अवघे ३९ वर्षांचे आयुष्य जगलेले स्वामी विवेकानंद यांनी ‘जीवनलीला’ संपवली तेव्हा त्यांच्या नावाचे, जीवनाचे, विचारांचे असलेले आकर्षण आजही तेवढेच आहे. त्यात काहीही फरक नाही. त्यामुळेच आधुनिक भारताच्या नवोत्थानात सहभागी झालेल्या लोकांनी विवेकानंदांकडून प्रेरणा घेतल्याचे दिसते.
First published on: 23-11-2012 at 11:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami vivekanand is common peoplesays rss chief mohan bhagwat