युनायटेड मुस्लिम अॅक्शन कमिटीचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन गुरुवारी शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात करण्यात आले. शिवसैनिकांनी शंखध्वनी करत ओवेसी यांचा निषेध नोंदविला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांचा समावेश होता.
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्याला २० वर्षे पूर्ण होत असून त्या संदर्भात युनायटेड मुस्लिम अॅक्शन कमिटीने सभा आयोजित केली होती. सभेमध्ये बाबरी मशिदीची एक इंचही भूमी श्रीराम मंदिरासाठी देणार नाही, त्या ठिकाणी पुन्हा मशीदच उभारली जाईल असे आव्हानात्मक वक्तव्य त्या पक्षाचे खासदार ओवेसी यांनी केले होते. ओवेसी यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते शिवाजी चौकात जमले. खासदार ओवेसी यांचा धिक्कार असो, मतांध आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शंखध्वनी करीतच ओवेसी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिर उभारू असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
या आंदोलनात शिवसेनेचे नगरसेवक राजू हुंबे, सनी अतिग्रे, दुर्गेश लिंग्रज, रणजित जाधव, किरण पडवळ, सुनील जाधव, पूजा कामटे, पूजा भोर, मंगल कुलकर्णी आदींचा समावेश होता.