बी. एस्सी. व बी. सी. एस. द्वितीय वर्षांच्या संगणकशास्त्र विद्यार्थ्यांची ऐच्छिक विषयाची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी युवा सेनेचे ऋषिकेश खैरे यांनी निवेदनाद्वारे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्याकडे केली.
बुधवारी ही परीक्षा जाहीर केली. मात्र, परीक्षार्थी विद्यार्थी केंद्रावर पोहोचल्यावर ही परीक्षा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. परीक्षा विभागाने या संदर्भात दिलेल्या सूचना अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. या विषयाची परीक्षा पुन्हा घेण्याची गरज असल्याचे युवा सेनेने म्हटले आहे. परीक्षा नियमांमध्ये कुठलाही बदल करायचा असल्यास विद्यार्थ्यांना किमान १५ दिवस आधी कळवावे लागते. विद्यापीठाच्या चुकीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. या पूर्वी जालना येथे वृत्तपत्रविद्या विभागात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनाही याच प्रकारे न्याय द्यावा, अशी मागणी ऋषिकेश खैरे यांनी केली. भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ, मिथुन व्यास, मनोज क्षीरसागर, विजय पाटील, वर्षां खेडकर यांनी विद्यापीठात या अनुषंगाने निवेदन दिले.