शिक्षकांना दिवाळीपूर्वीच वेतन मिळेल, असा विश्वास शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.
जि. प.च्या बहुविध प्रशालेत आमदार काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षक दरबारात विविध शिक्षण संस्थांचे चालक, प्राध्यापक व शिक्षकांच्या प्रश्नांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शिक्षण अधिकारी शिवाजी पवार, प्राचार्य के. व्ही. महाजन, विठ्ठलराव मुटकुळे, रवी शेळके आदींची उपस्थिती होती. शिक्षक दरबारात भविष्यनिर्वाह निधीच्या कोष पावत्या डिसेंबपर्यंत देण्याच्या सूचना करण्यात आल्या, तर शिक्षकांना दिवाळीपूर्वीच वेतन मिळावे, या बाबत सरकारकडे आपला आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. डिग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद राज्यस्तरावर स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमात प्रथम आल्याने मुख्याध्यापक एकनाथ कऱ्हाळे यांचा आमदार काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येथील कार्यक्रमानंतर आमदार काळे यांनी िलबाळा मक्ता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली. संस्थेच्या वतीने आमदार काळे यांचा सत्कार करण्यात आला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निदेशकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही काळे यांनी दिली. राज्यातील आयटीआय निदेशकांच्या समुपदेशन पद्धतीने बदल्या होत असल्यामुळे बहुतांश निदेशकांचे प्रश्न सुटले. आता उर्वरित प्रश्नांसाठी पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.