दिवसभर गजबजून गेलेले वांद्रे-कुर्ला संकुल संध्याकाळी तेथील कार्यालये सुटल्यानंतर एकदम सुनसान होऊन जाते. कार्यालयीन गर्दी वगळता रात्रीही हा परिसर तितकाच गजबजलेला असावा यासाठी या परिसरात विविध दुकाने, उपहारगृह आणि सुपरमार्केट उपलब्ध असणाऱ्या इमारतीचे काम पूर्णत्वास येत असून त्यासाठी प्राधिकरणाने नामांकित कंपन्यांकडून ई-निविदा मागवल्या आहेत.
वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जीएन’ ब्लॉक, प्लॉट क्रमांक सी-५ या जागेत वांद्रे-कुर्ला जोडरस्ता आणि एशियन हार्ट हॉस्पिटल यांच्या जंक्शनवर हे अर्बन प्लाझा उभारण्यात येत आहे. या चार मजली अर्बन प्लाझाच्या तळमजला आणि पहिला मजल्यावर दुकाने आणि उपहारगृहांना जागा देण्यात आली आहे. तर दुसरा, तिसरा आणि चौथा मजला हा सुपरमार्केटसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
अर्बन प्लाझातील या दुकानांसाठी आणि उपहारगृहांसाठी प्रथम दर्जाची दुकाने आणि उपहारगृह चालवण्याचा कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्या कंपन्याच निविदा प्रस्तुत करू शकतात, असे प्राधिकरणाने नमूद केले आहे. या कंपन्यांची गेल्यावर्षी ६ कोटींची उलाढाल केलेली असणे आणि त्यांचे निव्वळ मूल्य ४ कोटी रुपये असणे आवश्यक आहेत.
या निविदा १६ मे २०१४ पर्यंत http://etendermmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. हे ई-निविदा अर्ज भरून २६ मे २०१४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी भूमी आणि मिळकत व्यवस्थापक, भूमी शाखा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी २६५९४१०२ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.