वाढत्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजीतील यंत्रमागधारक, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व उद्योजकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर आज गुरुवारी थाळीनाद आंदोलन केले. तत्पूर्वी दुचाकीवरून मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वाढत्या वीज दरामुळे राज्यातील उद्योगधंदे बंद पडण्याची, ते अन्य राज्यांत स्थलांतरित होण्याची
भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे वाढीव वीज दर रद्द करा, अनुदानाच्या रकमेत वाढ करावी या मागणीसाठी विविध उद्योजक संघटनांनी गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता.    
इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारक, औद्योगिक संघटना यांच्या वतीने शाहू पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. यंत्रमागधारक व उद्योजक दुचाकीवर बसून घंटा, थाळीनाद करीत मोर्चात सहभागी झाले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर याप्रश्नी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा महावितरणच्या कार्यालयासमोर पोहचला. प्रवेशव्दारावर मोर्चा अडविण्यात आल्याने तेथे घंटा व थाळीनाद करण्यात आला. वीज दरवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.     
यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, पुंडलिक जाधव, मदन झोरे, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, सचिन हुक्कीरे, सर्जेराव पाटील, वसंत पाटील, दीपक राशीनकर, गणेश भांबे, अशोक भुगड यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. कार्यकारी अभियंता केशव सदा कळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.    वीज दरवाढ रद्द होण्यासाठी १५ व १६ डिसेंबर रोजी आमदार, खासदारांना घेराओ, १८ डिसेंबरला नागपूर विधान भवनासमोर धरणे असा आंदोलनाचा पुढील टप्पा असल्याचे प्रताप होगाडे यांनी जाहीर केले.