अपंग पालकांची मुलगी सिमरन बारावीची परीक्षा मुंबईच्या सहृदयी दाम्पत्यामुळे देऊ शकणार आहे. कळंबोली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयामधील विद्यार्थिनी सिमरन धामी हिचे पालक शुल्क भरू न शकल्याने तिला महाविद्यालय प्रशासन परीक्षा प्रवेशपत्र देत नव्हते. याबाबत माहिती ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यावर मुंबई पोलीस आयुक्तालयातील बीकेसी येथील सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांच्या पत्नी डॉ. प्रगती या सिमरनच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. घोसाळकर दाम्पत्याने सिमरनचे शुल्क महाविद्यालयात जमा करून तिला मोलाचे सहकार्य केले. मग महाविद्यालयानेही दहा हजारांची सवलत देऊन सिमरनला परीक्षा प्रवेशपत्र दिले आहे. 

सिमरनचे आई-वडील अपंग आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते सिमरनचे महाविद्यालयीन शुल्क भरू शकले नाहीत. सिमरनच्या वर्गातील सर्वाना परीक्षा प्रवेशाचे ओळखपत्र मिळाले, मात्र आपल्याला मिळणार नाही या दडपणाखाली मागील अनेक दिवसांपासून सिमरन घरी रडत रडत अभ्यास करत होती. घोसाळकर दाम्पत्याने सिमरनच्या शुल्काची जबाबदारी घेतल्यावर महाविद्यालयाने शुल्कातील दहा हजार रुपयांची सवलत सिमरनला दिली. घोसाळकरांच्या वतीने आज सेंट जोसेफ विद्यालयात सिमरनसाठी २९ हजार ४२५ जमा करण्यात आले. या वेळी अनोख्या सामाजिक बांधीलकीची आठवण विद्यालयाच्या परिसरात झाली. विशेष म्हणजे पनवेलमध्ये अनेक बडय़ा नेत्यांची स्वत:ची शैक्षणिक संकुले आहेत. पण यापैकी एकही जण सिमरनच्या मदतीला धावून आला नाही. तेथील शैक्षणिक कुपोषणाबाबत मुंबईतील चाकरमान्यांनी घेतलेला पुढाकार वाखणण्याजोगा ठरला आहे. सिमरनला तिच्या वडिलांनी परीक्षेचे प्रवेशपत्र घरी आणून दिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
लोकसत्ताचे आभार
‘लोकसत्ता’ने बातमी देऊन केलेल्या सहकार्याबद्दल तसेच घोसाळकर दाम्पत्याने केलेल्या मदतीबद्दल सिमरनने मनापासून आभार मानले आहे. शिक्षणात रुची असणाऱ्या प्रत्येक मुलीच्या पाठीमागे घोसाळकर कुटुंबीयांसारखे दाते असणे गरजेचे असल्याची भावना तिने व्यक्त केली.