देवेंद्र फडणवीस अभ्यासू आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न लावून धरणारा नेता आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याने राज्याचा विकास करावा आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा आहे. मी विरोधात निवडणूक लढलो तरी देवेंद्र मुख्यमंत्री झाल्याचा एक मित्र म्हणून आनंद आहे आणि मित्रत्व हे कायम राहणार आहे, असे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दोनवेळा निवडणूक लढलो मात्र दोघांनी कधीच एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप केले नाही. विचारांमध्ये मतभेद होते. मात्र, मनभेद कधीच नव्हते. विरोधी पक्षात असताना त्यांनी सभागृहात जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांवर त्यांनी विचार करावा. सत्तेची चाबी देवेंद्रच्या हातात आहे त्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असे शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले.
नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार असेल तरी मित्रांना मात्र विसरणार नाही. प्रचंड मेहनत करण्याची, विकासाची दिशा आणि आई वडिलांचे संस्कार यामुळे देवेंद्र आपल्या कार्यकाळात राज्यात वेगळा बदल घडवून आणले यात शंका नाही. तो राज्याचा विकास करु शकतो असा आत्मविश्वास आहे, असे आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार विवेक रानडे म्हणाले.
मित्र म्हणून हाकेला ओ देणारा देवेंद्र फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडून माझ्यासहीत अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनधिकृत ले आऊटची मोठय़ा प्रमाणात समस्या असून त्यावर काहीच तोडगा निघत नाही त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करून महापालिकेला सर्व अधिकार द्यावे, गोसेखुर्द प्रकल्प मागी लावावा, केवळ भूमीपूजन आणि कौतुक सोहळे न करता पाच वर्षांत देवेंद्रने उपराजधानीसह राज्याचा विकास करावा, असे मत शेफ आणि उद्योजक विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2014 रोजी प्रकाशित
विरोधक आणि मित्रांच्या अपेक्षा
देवेंद्र फडणवीस अभ्यासू आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न लावून धरणारा नेता आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याने राज्याचा विकास करावा आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा आहे.
First published on: 31-10-2014 at 02:23 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The expectations of friends and opponents from devendra fadnavis