नागपूर महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या औचित्याने ११ व १२ जानेवारीला नागपुरात अखिल भारतीय महापौर परिषद आयोजित केली असल्याची माहिती अखिल भारतीय महापौर परिषदेचे सरचिटणीस व महापौर अनिल सोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडमध्ये शनिवारी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष आणि इंदोरचे महापौर कृष्णमुरारी मोघे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उद्घाटनाला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, मध्य प्रदेशचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उमाशंकर गुप्त, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आणि माजी महापौर देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहतील. सभास्थानाला नागपूरचे पहिले महापौर दिवंगत शेषराव वानखेडे यांचे नाव देण्यात आले आहे.
महापौर परिषदेत शहराचा कायमस्वरुपी अथवा टिकावू विकास, महापालिकेतील कायदे, महापालिकांसाठी आयएएस कॅडर निर्मितीचा विचार, महापौरांचे अधिकार व कालावधी, घनकचरा व्यवस्थापन यासंबंधी चर्चा होणार असून तसे ठराव संमत केले जातील. विविध महापालिकांमधील अत्युकृष्ट उपक्रमांची माहिती दिली जाईल. १२ जानेवारीला  सकाळी ९ वाजता दीक्षाभूमी व त्यानंतर रेशीमबागेतील स्मृती भवनास भेट देतील. भांडेवाडीमधील प्रस्तावित महाजनको मॉडेलची पाहणी करतील. त्यानंतर कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देतील. त्या दिवशी कन्हान येथे जल शुद्धीकरण विषयावर चर्चा होईल. देशभरातून ६३ महापौरांचे येणे निश्चित झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३३ महापौर पोहोचतील. उपमहापौर जैतुनबी, नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्षनेते प्रवीण दटके, सभापती रमेश सिंगारे, सुनील अग्रवाल पत्रकार परिषदेला उपस्थित होते.