शहरातील गोभागवत कथा समारोपाच्या दिवशी ६ हजारांपेक्षा अधिक संख्येने जमलेल्या महिलांच्या गर्दीत चोरटय़ांनी डाव साधला. या वेळी १३ महिलांचे सुमारे ८ लाख रुपयांचे दागिने लांबविण्यात आले. गांधी चौक पोलीस ठाण्यात या बाबत तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बीड व जालना जिल्हय़ांतील ४ महिलांना अटक केली.
गेला आठवडाभर गोभागवत कथा लातुरात सुरू होती. त्यास भाविकांची मोठी गर्दी होती. महिलांचे प्रमाण उल्लेखनीय होते. महिलावर्ग कथा ऐकण्यात तल्लीन झाल्यानंतर संधी साधून मंगळसूत्र चोरांनी डाव साधला. कथा संपल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आलेल्या महिलांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात गर्दी केली. १३ महिलांनी आपले मंगळसूत्र, गंठण चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तब्बल २६ तोळे सोने चोरीला गेले. याची अंदाजे किंमत ८ लाख रुपये होते. पोलिसांनी बीड, जालना जिल्हय़ांतील ४ महिला आरोपींना या प्रकरणी अटक केली.