बलात्कारासंबंधीच्या कायद्याची चर्चा २००५ मध्ये सुरू झाली. मात्र, तो मंजूरच झाला नाही. त्या विधेयकात आता सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी विशेष अध्यादेश काढावा. कारण देशात सहा आमदार व दोन खासदारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. लोकप्रतिनिधींनी विनयभंग केला, अशा १४० तक्रारी आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अशा उमेदवारांना तिकीट दिले जाऊ नये, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या केंद्रीय समितीचे सदस्य अंजली दमानिया आणि मयंक गांधी यांनी केली. शहरात सेव्हन हिलजवळ ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स येथे आम आदमी पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दिल्ली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जमलेल्या जमावावर थंडीत पाण्याचा मारा करणे, लाठीहल्ला करणे हे पूर्णत: चुकीचे असून मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही आणि हा प्रश्न राज्याचा आहे असे म्हणून ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री वागत आहेत, ते तर पूर्णत: चुकीचे आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आम आदमी पार्टीचा उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असणार नाही, तसेच तो भ्रष्टाचारी असणार नाही अशी काळजी उमेदवारी देताना घेऊ, असेही मयंक गांधी म्हणाले.
आम आदमी पार्टीत अधिकाधिक  सज्जन उमेदवार देता यावेत यासाठी काही वेळा सक्रिय सभासदांचे मतदानही घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातून लोकसभेच्या निवडणुका लढवू, त्यासाठी संघटनात्मक बांधणी करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांची प्रतारणा कधीही केली नाही.
लोकशाहीत एक पर्याय देण्याचे ठरविले होते. त्याला अण्णांनीही पाठिंबा दिला होता. तो पर्याय म्हणून हा पक्ष स्थापन केला असल्याचे गांधी यांनी सांगितले.