भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने सोडावीत याकरिता रविवारी संगमनेर येथे होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आग्रह धरणार असल्याचे आमदार भाऊसाहेब कांबळे व माजी आमदार जयंत ससाणे यांनी सांगितले.
कांबळे व ससाणे यांनी जायकवाडीला देण्यात येणाऱ्या पाण्यास विरोध दर्शविलेला नाही.  यापूर्वी जायकवाडीला पाणी देण्यास दोघांनीही विरोध केला होता. पण, आता त्यांनी त्यावर मौन बाळगले आहे. पाणी नियोजनाची मागणी करताना त्यांनी प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेण्यासाठी ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची मागणीही केली आहे.त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचा प्रथमच पाणी नियोजन करताना विचार केला जात आहे.
कालवा सल्लागार समितीची बैठक संगमनेर येथे रविवारी (दि. २५) होत आहे. त्याकरिता कांबळे व ससाणे यांनी पाणी नियोजन सूचविले आहे. पहिले आवर्तन दि. ५ डिसेंबर ते १० डिसेंबर या काळात सोडावे ते २७ ते २८ दिवसांचे होईल. आवर्तनात २८०० दशलक्ष पाणी सोडावे. त्यानंतर २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पिण्याकरिता ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन करावे. उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन २४ फेब्रुवारी ते २१ मार्चच्या दरम्यान करावे. त्यासाठी २५०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करावा. नंतर पिण्याचे स्वतंत्र आवर्तन १४ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान ४०० दशलक्ष घनफुटाचे करावे. उन्हाळा हंगामातील दुसरे शेतीसाठी व पिण्यासाठी १८०० दशलक्ष घनफूट पाण्याचे तिसरे शेवटचे आवर्तन करावे, १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान ४०० दशलक्ष घनफूट पाणी पिण्याकरीता सोडावे. पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्यानेच तालुक्यात उसाच क्षेत्र वाढल्याचा दावा कांबळे व ससाणे यांनी केला आहे.