केंद्र शासनाच्या जेएनएनआरयूएम योजनेंतर्गत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात वातानुकूलित व्हॉल्वो बस गाडय़ांपाठोपाठ आता १४० साध्या आणि ५० मिडी बसगाडय़ा दाखल होणार असून त्यासाठी केंद्र शासनाने यापूर्वीच तब्बल १३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. मात्र, या नवीन गाडय़ा उभ्या करण्यासाठी परिवहन सेवेकडे जागाच उपलब्ध नसल्याचे समोर आले असून परिवहन सेवेचे मानपाडा आणि ओवळा येथील नियोजित आगाराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिवहन प्रशासनाने आधी आगाराचे काम पूर्ण करायचे आणि त्यानंतरच नवीन बसगाडय़ा घ्यायच्या, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणेकर प्रवाशांना आता नवीन बसगाडय़ांसाठी किमान एक वर्षभर वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सध्या ३१३ बसगाडय़ा असून त्यापैकी २०० बसगाडय़ाच प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित बसगाडय़ा नादुरुस्त असल्याने आगारात धूळ खात पडल्या आहेत. याशिवाय भाडेतत्त्वावरील २५ पैकी १३ ते १५ बसगाडय़ाच रस्त्यावर धावत आहेत. ठाणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत परिवहन सेवेच्या बसगाडय़ा दळणवळणासाठी अपुऱ्या पडत असल्याचे दिसून येते. याच पाश्र्वभूमीवर ठाणे परिवहन प्रशासनाने २०१३ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन सुमारे ४०० नवीन बस गाडय़ा खरेदीचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठविला होता. मात्र, २३० नवीन बसगाडय़ा खरेदी करण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आणि त्यासाठी सुमारे १३० कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. २३० बसगाडय़ांमध्ये १४० साध्या ५० मिडी आणि ४० वातानुकूलित बसचा समावेश आहे. त्यापैकी दहा वातानुकूलित बसगाडय़ा परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित बसगाडय़ाही लवकरच परिवहन सेवेच्या ताफ्यात येतील आणि दळणवळणासाठी चांगली सुविधा मिळेल, अशी आशा ठाणेकरांना वाटू लागली होती. मात्र, ती आता फोल ठरली आहे. नवीन बसगाडय़ा आजही परिवहन सेवेच्या ताफ्यात येऊ शकतात. मात्र, त्या उभ्या करण्यासाठी आगारच उपलब्ध नाही. त्यामुळे परिवहन प्रशासनाने मानपाडा आणि ओवळा आगाराचे काम पूर्ण झाल्यानंतरच या बसगाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या वृत्तास परिवहन सेवेचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दुजोरा दिला आहे.
नवे आगार पुढल्या वर्षीच
ठाणे परिवहन सेवेने ओवळा परिसरात बसगाडय़ांसाठी आगार उभारण्याचा निर्णय घेतला होता. या आगारात १५८ बसगाडय़ा उभ्या राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात या आगाराचे काम अद्याप पूर्णच झालेले नाही. ठेकेदाराला नुकतेच कामाचे कार्यादेश देण्यात आले असून येत्या आठवडाभरात काम सुरू होणार आहे. तसेच मानपाडा येथील मुल्लाबाग परिसरातील आगाराचे काम नुकतेच सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आगारांचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास १२ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
नव्या बसगाडय़ा आगाराच्या प्रतीक्षेत..!
केंद्र शासनाच्या जेएनएनआरयूएम योजनेंतर्गत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात वातानुकूलित व्हॉल्वो बस गाडय़ांपाठोपाठ आता १४० साध्या आणि ५० मिडी बसगाडय़ा दाखल होणार
First published on: 04-11-2014 at 07:08 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmt problem