उन्हाळ्यात कूलरचा वापर सर्वत्र मोठय़ा प्रमाणात होत असतो. अनेकदा कूलरमध्ये विजेचा प्रवाह आल्याने जीवित व वित्त हानीच्या घटना घडतात. अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेची उपाययोजना करण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
कूलरमधील प्रवाहित विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याच्या घटना तसेच अपघात उन्हाळ्यात घडतात. ते टाळण्यासाठी ग्राहकांनी कूलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहजरित्या उपलब्ध असून विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टाळता येतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी. कूलरच्या लोखंडी बाह्य़भागात वीज पुरवठा येऊ नये यासाठी कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी जेणेकरून कूलरच्या लोखंडी बाह्य़भागात वीज प्रवाहित झाल्यास त्याचा धक्का लागणार नाही.
कूलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कूलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे. कूलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडालेली नसल्याची खात्री करून घ्यावी. कूलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये. कूलरची वायर सदैव तपासून बघा. फायबर बाह्य़भाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर प्राधान्याने करा. घरातील मुले वा इतर सदस्य कूलरच्या सानिध्यात येणार नाही याची खबरदारी घेऊनच कूलर ठेवला जावा. कूलरमधील पाण्याचा पंप पाच मिनिटे सुरू व दहा मिनिटे बंद ठेवणाऱ्या लीकेज सर्किट ब्रेकर्स वापर करा. यामुळे विजेचीही मोठय़ा प्रमाणात बचत शक्य आहे. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर इभे राहून पंप सुरू करू नये. पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करून त्याचा प्लग काढल्यानंतरच पंपाला हात लावावा.
पंप पाण्यात बुडाला नसल्याची खात्री करून घ्यावी तसेच पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडाली नसावी. पंपाचे अìथग योग्य असल्याचे तपासून घ्यावे. पंपातून पाईप लाईन मध्ये वीज प्रवाहित होणार नसल्याची काळजी घ्यावी. बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायिमग करणे आवश्यक असते. बरेचदा ज्ञानाच्या अभावामुळे चालू पंपाचे प्रायिमग केले जाते. अशावेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालू पंपाचे प्रायिमग करणे टाळावे, असे आवाहन ‘महावितरण’चे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी केले.