राज्यातील अनेक सहकारी संस्था गैरव्यवहार आणि मनमानी कार्यपद्धतीमुळे डबघाईस आल्या आहेत . ही वास्तव परिस्थिती नाकारून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निवेदनातील वस्तुस्थितीवर टीका करीत आहेत याचे आश्चर्य वाटते. सत्य समजून घेण्यास कोणी तयार नाही हेच यावरून दिसते अशी प्रतिक्रिया भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केली आहे.
अलीकडेच शरद पवार यांनी सहकार क्षेत्रावर आरोप करणे ही फॅशन झाली असल्याचे उत्तर अण्णा हजारे यांनी केलेल्या सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर दिले होते. सहकारातील वाढत्या भ्रष्टाचारावर अण्णा सत्य बोलले. परंतु दिवसेंदिवस सत्याकडे डोळेझाक केली जात आहे असे करंजकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, जिल्हा सहकारी व नागरी बँका, पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. या सहकारी संस्था अडचणीत आणणाऱ्या शेकडो संचालकांविरुद्ध कलम ८८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. नेत्यांनी गैरव्यवहार व भ्रष्टाचारातून सहकारी चळवळ बदनाम केली आहे. ही वस्तुस्थिती नाकारणे उचित नाही, असेही करंजकर यांनी म्हटले आहे.