‘गडद जांभळं’ या आदिवासींच्या जीवनावरील चित्रपटातही त्या समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका नरेंद्र दाभोळकर यांनी केली होती. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. ‘श्रद्धा जपा, पण अंधश्रद्धा दूर ठेवा’ असा संदेश देणारे पात्र दाभोळकरांनी या चित्रपटात साकारले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश असल्याने दाभोळकरांनी अजिबात आढेवेढे न घेता आणि एक रुपयाही मानधन न घेता ही भूमिका साकारली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पुढच्या महिन्यात मेधा पाटकर, अण्णा हजारे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक विशेष खेळ आयोजित केला जाणार होता. त्यासाठी या साऱ्या मंडळींना एकत्र करण्याची जबाबदारीही दाभोळकरांनी स्वीकारली होती. पण तो कार्यक्रम राहून गेला.