दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्याने भूजल पातळी आणखी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील पाण्याची परिस्थिती भीषण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शहरातील वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात उद्या शुक्रवारी भूजलावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादाचा विषय ‘भूजल सर्वेक्षण व पुनर्भरण’ असा आहे. या परिसंवादात भूजल तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. यात प्राचार्य डॉ. एस. के. वडगबाळकर यांचे ‘भूजलाचा खडकाशी संबंध’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, तर डॉ. ए. बी. नारायणपेठकर  ‘भूजल साठा व आधुनिक संशोधन’ या विषयावर मांडणी करणार आहेत. याशिवाय डॉ. बी. एस. पाटील (भूजल सर्वेक्षण व पुनर्भरण), डॉ. टी. पी. सावंत (पाणी हेच जीवन) यांचीही व्याख्याने होणार आहेत. या परिसंवादात शेतकऱ्यांचाही सहभाग राहणार आहे. निवडक २० शेतकऱ्यांच्या शेतातील भूजल संशोधन मोफत केले जाणार आहे. वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे व समन्वयक डॉ. पी. डी. माळी यांनी या परिसंवादाचे नियोजन केले आहे.