आयआरबी कंपनीला दिलेल्या भूखंडावर हॉटेल बांधकामासाठी देण्यात आलेली बिगर शेतीची (एनए) परवानगी चुकीची असून, ती रद्द होईपर्यंत सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी जाहीर केला. तसेच येत्या चार दिवसांत शहरातील पाच टोल नाक्यांवर शहरातील चारचाकी गाडय़ा उभ्या करून चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी या वेळी केली. टोलविरोधी कृती समितीच्या आढावा बैठकीत ही घोषणा करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर सुनीता राऊत होत्या. या बठकीला सर्वपक्षीय नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, टोलविरोधी कृती समितीचे सदस्य व सर्वपक्षीय नेते, कार्यकत्रे उपस्थित होते.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, आयआरबी कंपनीला टिंबर एरिया मार्केट येथील ३ लाख चौरस फुटांची आरक्षित जागा देण्यात आली. त्यावर हॉटेल बांधण्यासाठी एन.ए.ची परवानगी दिली गेली. मात्र कागदपत्रांचा घोळ घालून दिलेली ही परवानगीच मुळी चुकीची आहे. तेव्हा ती रद्द करेपर्यंत सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल, त्यांनी यास असमर्थता दर्शवली तर त्यांची शिफारस घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत याबाबतच्या निर्णयासाठी पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, शहरातील टोलविरोधी आंदोलनात चारचाकी वाहनधारकांचा समावेश कमी आहे. ज्यांची चारचाकी वाहने नाहीत ते या आंदोलनात दिसून येत आहेत. तेव्हा चारचाकीधारकांची आंदोलनातील संख्या वाढविणे गरजेचे आहे. आंदोलनाचा प्रत्येक घाव हा यशासाठी असणार आहे. येत्या चार दिवसांत शहरातील शिये, शिरोली, शाहू, सरनोबतवाडी, फुलेवाडी या नाक्यांच्या दुतर्फा शहरातील प्रत्येक चारचाकी वाहन उभे करून चक्काजाम आंदोलन केले जाईल.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, टोल विरोधात आजवर सर्व मार्गानी आंदोलने केली, पण हातात फसवणुकीशिवाय काहीच आले नाही. सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे. वारंवार आंदोलन करण्यापेक्षा एकदाच घरातून बाहेर पडू व टोल रद्द झाल्यानंतरच घरी परतू, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले ,टोलविरोधात सुरू असलेल्या उपोषणावेळी मंत्र्यांनी आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेतले त्या वेळी शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोऱ्हे यांनी लेखी आश्वासन घेण्याची विनंती केली होती. मात्र तसे कोणतेच आश्वासन न घेतल्या दुसऱ्या दिवशी टोल सुरू झाला आणि जनतेत उद्रेक झाला.
टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी शहरातील टोल नाक्यांवर स्थानिक लोक कामगार म्हणून आहेत. त्यांनी आपण कोल्हापूरकर असल्याची जाणीव ठेवून येत्या चोवीस तासांत काम सोडावे. आयआरबीने कर्मचारी आयात केल्यावर त्याचे आपण काय करायचे ते पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष िहदुराव चौगुले, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, दिलीप पवार, जयंत पाटील यांची भाषणे झाली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2014 रोजी प्रकाशित
आज ठिय्या आंदोलन
आयआरबी कंपनीला दिलेल्या भूखंडावर हॉटेल बांधकामासाठी देण्यात आलेली बिगर शेतीची (एनए) परवानगी चुकीची असून, ती रद्द होईपर्यंत सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी जाहीर केला.
First published on: 10-02-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today squat down movement