टोलविरोधात पुणे-बंगळुरू महामार्ग रोखण्याच्या मनसेच्या पाच नेत्यांच्या नेतृत्वाखालील एकंदर २५ कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन म्हणजे फोटोसेशन ठरताना, काही क्षणाकरताही महामार्ग ठप्प ठेवण्यात राजसेना अपयशी ठरली. मात्र, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील त्यांची घोषणाबाजी आणि महामार्गाकडे धावण्याची आक्रमकता लक्ष्यवेधी होती. या वेळी आंदोलकांच्या दुपटीने तैनात असलेल्या पोलीस फौजफाटय़ाची पुरती धांदल उडाली. तर, दुसरीकडे कराडनजीकच्या तासवडे टोलनाक्यावरही चोख बंदोबस्त राहताना, कुठल्याही प्रकराचे आंदोलन येथे झाले नसल्याचा दावा संबंधित सूत्रांनी केला आहे.
आज सकाळी ११ वाजता कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यासमोर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, महेश जगताप, दादा शिंगण, नितीन महाडिक, सागर बर्गे या नेत्यांनी आपल्या मर्यादित टीमसह जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी खबरदारी म्हणून अगोदरच येथे पोलीस छावणीचे स्वरूप आणले होते. घोषणाबाजीच्या दोन्ही बाजूला पोलीस निरीक्षक संजय सुर्वे व हेल्मेटधारी बी. आर. पाटील यांच्यासह जवळपास ५० ते ६० पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात होता. घोषणा सुरू असतानाच, अचानक आंदोलनकर्ते महामार्गावर धावले. या वेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली. मात्र, मर्यादित आंदोलनकर्ते आणि सशस्त्र चोख बंदोबस्त यामुळे काही क्षणातच आंदेालनकर्त्यांची उचलबांगडी होऊन त्यांना स्थानबध्द करण्यात आले. या वेळी पोलीस व कार्यकर्त्यांंत चांगलीच झटापट झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
घोषणाबाजी अन् आक्रमकतेने आंदोलनाची औपचारिकता पूर्ण
कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील त्यांची घोषणाबाजी आणि महामार्गाकडे धावण्याची आक्रमकता लक्ष्यवेधी होती. या वेळी आंदोलकांच्या दुपटीने तैनात असलेल्या पोलीस फौजफाटय़ाची पुरती धांदल उडाली.
First published on: 13-02-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll agitation raj thackeray mns