नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातून जायकवाडी जलाशयात पाणी सोडावे, या मागणीसाठी उद्या काँग्रेसचे आमदार कल्याण काळे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर श्रेय मिळविण्यासाठी ही नौटंकी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केला आहे. दरम्यान मराठवाडा विकास जनता विकास परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत समन्यायी पाणीवाटपाचा न्यायालयीन लढा मुंबई येथे सुरू ठेवण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्याचे ठरविण्यात आले. प्रख्यात विधीतज्ज्ञांशी संपर्क करण्यात आला असून ही लढाई न्यायालयात आणि रस्त्यावर सुरूच ठेवली जाईल, असे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश काब्दे यांनी सांगितले. अजिंठा येथील अभ्यागत केंद्राच्या उद्घाटनानिमित्त उद्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद येथे येणार आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याने पाण्याचा मुद्दा आग्रहीपणे मांडण्यासाठी राजकीय पक्ष आणि संघटना सरसावल्या आहेत.
जायकवाडी जलाशयात समन्यायी प्रमाणात पाणी असावे, या मागणीसाठी वेगवेगळ्या पक्ष संघटना जनजागरण व आंदोलने करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेतल्याने काँग्रेसची अडचण झाली होती. नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या नेत्यांवर मराठवाडय़ातून रोष व्यक्त होत आहे. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील हे टीकेचे लक्ष झाल्याने जायकवाडीत समन्यायी पाणीवाटप करण्याला काँग्रेसचा विरोध आहे, असे चित्र निर्माण झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका व्हावी, अशी व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पद्धतशीरपणे केली गेल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाला सामोरे जावे लागेल, असे चित्र दिसताच काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी १६ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचे जाहीर केले. जायकवाडीत सध्या २२ टक्के पाणीसाठा आहे. वरच्या धरणात पाणी अडवून ठेवले जाते, त्यामुळे औरंगाबादसह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत वरील धरणातून मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडावे, अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे. काळे यांनी उपोषण करण्याचे जाहीर केल्यावर भारतीय जनता पक्षाने त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेय मिळविण्यासाठी असल्याचा आरोप केला. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अॅड. विकास देशमुख, जायकवाडी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह भाजप व शिवसेनेने या प्रश्नी आंदोलन केले आहे. केवळ श्रेय मिळविण्यासाठी काळे उपोषण करत असल्याचा आरोप बोराळ यांनी पत्रकार बैठकीत केला. न्याय द्यायचाच असेल तर काळे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान नाशिक जिल्ह्य़ातून समन्यायी पाणीवाटपाच्या विरोधात आणखी तीन याचिका मुंबई येथील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांची सुनावणी मुंबई येथे होणार असल्याने तेथील तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषद प्रयत्न करणार आहे.