अनेक स्तंभ रिकामे..
तीन वर्षांपूर्वी गृहमंत्र्यांच्या हस्ते मोठय़ा गाजावाजाने सुरू करण्यात आलेले शहर वाहतूक पोलिसांचे संकेतस्थळ अद्यापही अद्यावत करण्यात आले नसून अनेक स्तंभ रिक्तच असल्याने हे संकेतस्थळ शोभेचे ठरले आहे.
मोठा गाजावाजा करून २०११ मध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते ‘६६६.ल्लंॠस्र्४१३१ंऋऋ्रूस्र्’्रूी.१ॠ’ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तत्कालीन सहपोलीस आयुक्त डी. कनकरत्नम व वाहतूक पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्या पुढाकाराने ते सुरू झाले. वाहतुकीचे नियम, ते मोडल्यास दंड वगैरे माहिती त्यात अद्यापही आहे. त्यानंतर ती केवळ एकदाच अद्यावत (अपडेट) करण्यात आले. विद्यमान पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकारी कोण, त्यांचा संपर्क क्रमांक वगैरेंचा यात उल्लेखही नाही. अनेक स्तंभही रिक्तच आहेत. ‘लेटेस्ट अनाऊसमेंट’ या स्तंभात २०१३मध्ये झालेल्या अॅडव्हांटेज विदर्भच्या वाहतूक व्यवस्थेची, २०१३मध्ये झालेल्या रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती आहे.
त्यानंतरची माहिती नाही. प्रेस नोटिफिकेशनमध्येही हीच माहिती आहे. ट्रॅफिक प्लॅनर या स्तंभात नागपुरातील सहा महत्त्वाचे मार्ग दिले आहेत. ‘हेल्पलाईन नं.’वर क्लिक केल्यानंतर तेथेच क्रमांकच दिसत नाही. फोटो गॅलरीत गेल्यावर्षी २०१३ मध्ये आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाचे विविध कार्यक्रम तसेच ‘आरएसपी’ दिन कार्यक्रमाची छायाचित्रे दिसतात. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अनेक उपक्रम राबवले. मात्र, त्यासंबंधीचे एकही छायाचित्र नाही. ट्रॅफिक कॅलेंडरही २०१३चेच आहे.
वास्तविक गेल्या महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान झाले. ‘लेटेस्ट अनाऊसमेंट’ या स्तंभात या अभियानाबद्दल माहिती प्रसिद्ध करता येऊ शकली असती. एक अक्षरही माहिती या स्तंभात नाही. ‘ट्रॅफिक ऑन मोबाईलल्स’ यावर क्लिक केल्यास ‘वेबसाईट करंटली अंडर कन्स्ट्रक्शन’ असा फलक उद्घाटनापासून आजतागायत झळकतो आहे. हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर ते अद्यावत करावेसे एकाही अधिकारी व कर्मचाऱ्याला वाटू नये, हे आश्चर्यकारक आहे. हे संकेतस्थळ सर्वागसुंदर आहे, यात शंका नसली तरी त्यातील माहितीच अत्यल्प असल्याने ते शोभेचे ठरले आहे. हे संकेतस्थळ सुरू होताच ‘स्टॉप’, ‘थिंक’ असे शब्द झळकतात. ते या संकेतस्थळात अत्यल्प माहिती असल्याचे सुचवतात, हे नंतर निदर्शनास येते.
तरुणाईपर्यंत पोहोचावेच लागणार
आधुनिक युगात संकेतस्थळ संबंधित संस्थेचा आरसा समजला जातो. त्याचे महत्त्व पोलीस दलही ओळखून असून ते वेगळे सांगण्याची गरज नाही. हे संकेतस्थळ आतातरी अपडेट केले जावे. नागरिक माहितीपासून वंचित राहणार नाहीत, त्रुटी दूर केल्या जायला हव्या. वाहतूक शिक्षणाची सर्वाधिक गरज तरुणाईला असून ही तरुणाई संगणकाचा पर्यायाने सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करते. त्यामुळे नव्या युगाबरोबर वाहतूक पोलिसांनाही चालावेच लागेल. हे संकेतस्थळ रोज अपडेट करावे लागेल. संकेतस्थळ, फेसबुक, व्हॉट्स अप, टय़ुटर, गुगल आदींच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना तरुणाईपर्यंत पोहोचावेच लागणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा यांच्यासह अनेक तरुण पोलीस अधिकारी नागपुरात आहेत. त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.