धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना आयत्यावेळी स्थलांतरित करण्यासाठी जागेचा प्रश्न आता ऐरणीवर येत आहे. मात्र सरकार आणि ‘म्हाडा’ने वेळीच काळजी घेतली तर संक्रमण शिबिरासाठी तब्बल सव्वातीन हजार घरे उपलब्ध होणे शक्य आहे. त्यामुळे आकस्मिकपणे रहिवाशांना बाहेर काढायचे झाल्यास निवाऱ्याअभावी त्यांना कुठे ठेवायचे, हा प्रश्नही निकाली निघेल.
मुंबईत गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांची घरे बांधण्याची जबाबदारी ‘म्हाडा’कडे सोपविण्यात आली आहे. अर्थात ही घरे बांधताना काही वाटा ‘म्हाडा’च्या संक्रमण शिबिरांसाठी ठेवण्याचे धोरण आहे. मागच्या वर्षी गिरण जमिनीवर १० हजार घरे उपलब्ध झाली, पण धोरणानुसार त्यापैकी ६९२५ घरे कामगारांसाठी, तर बाकीची तीन हजार घरे ही संक्रमण शिबिरासाठी ‘म्हाडा’कडेच राहिली. आता मुंबईत १५ गिरण्यांची ६२,५०७ चौरस मीटर जमीन कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध आहे. या जागेवर बांधकाम सुरू केल्यास कामगारांची घरे तर होतीलच; शिवाय संक्रमण शिबिरासाठीही ३२८३ घरे उपलब्ध होतील. अर्थात त्यासाठी ‘म्हाडा’ व सरकारने वेळीच घरांचे बांधकाम सुरू करणे गरजेचे आहे.
ही घरे बांधली तर संक्रमण शिबिरासाठी लक्षणीय प्रमाणात घरे उपलब्ध असतील. मुंबईत धोकादायक इमारतींच्या रहिवाशांना बाहेर काढताना त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मोठा असतो. संक्रमण शिबिरांची घरे हातात असल्यास गरजेच्या वेळी तातडीने त्यांचा वापर करून मोठी दुर्घटना टाळता येईल. विशेष म्हणजे त्यासाठी गिरण्यांच्या आयत्या जमिनीवर ही घरे होणार असल्याने संक्रमण शिबिरांच्या बांधकामासाठी वेगळी जमीन लागणार नाही. मोकळी जमीन सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधण्यासाठी वापरता येऊ शकेल.