जि. प.च्या जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जि. प. बठकीत विरोधकांनी अनेकदा आवाज उठविला. मात्र, प्रशासनाने उडवा-उडवीची उत्तरे देत चालढकल करीत या बाबत दुर्लक्षच केले. आता खुद्द विभागीय आयुक्तांनीच शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवून फिर्याद दाखल करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश बजावला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार काय, याची जि. प. वर्तुळात चर्चा होत आहे.
जि. प.चा ताबा असलेल्या जमिनीवर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. िहगोली पिपल्स बँकेनजीक पं. स.च्या गोदाम परिसरात झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. न्यायालयाने जि. प.च्या बाजूने निकाल दिला. दरम्यान, रीतसर पंचनामा करून जि. प. कृषी विभागाने जागेचा ताबा घेतला. मात्र, पुन्हा या जागेसह आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे करून अनेकांनी या जमिनीवर अतिक्रमण केले आहे.
अतिक्रमणाचा मुद्दा जि. प.च्या बठकीत अनेकदा गाजला. जागेचा ताबा आपल्याकडे असून मालकी मात्र महसूलची असल्याचे सांगून, तसेच थातुरमातुर उत्तरे देत वेळ मारून नेण्यात संबंधित अधिकाऱ्यांनी जि. प. सदस्यांवर आतापर्यंत मात केली. सेनगाव, जवळाबाजार येथील अतिक्रमणांचा मुद्दाही अनेक बठकांत गाजला. मात्र, त्यावर ठोस कारवाई करण्याकडे जि. प. प्रशासन कानाडोळा करीत आहे.