महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याच्या खेळीचा एक असलेला जेएनएनयुआरएम संसदीय स्थायी समितीचा एक दिवसाचा दौरा वांझोटा ठरणार असल्याचे कैलाश जोशी यांच्या विधानावरून स्पष्ट झाले. पंचतारांकित हॉटेलात उतरलेल्या समितीच्या सात सदस्यांनी नागपुरात सुरू असलेल्या जेएनएनयुआरएमच्या फक्त तीनच प्रकल्पांना भेट दिली.
केंद्राच्या निधीतून नागपुरात सुरू असलेल्या कामांच्या गैरव्यवहाराविरुद्ध संसदेत आवाज उठवून संसदीय समितीने नागपूर दौरा करावा यासाठी काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. यानिमित्ताने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी भाजपविरोधी वातावरण तयार करण्यासाठी मुत्तेमवार संधी शोधत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
नागपूर दौऱ्यावर आलेल्या सदस्यांपैकी कैलाश जोशी, फग्गनसिंग कुलास्ते, अजय संचेती भाजपचे तर अनिल देसाई शिवसेनेचे होते. त्यामुळे अवघ्या तीन प्रकल्पांची पाहणी करणारी समिती नागपूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अडचणीत आणणारा अहवाल देण्याची शक्यता
मावळली.
महापालिकेत केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत शहर बस सेवा, २४ बाय ७ नळ योजना, आनंद टॉकीज आययूबी, ई गव्हर्ननन्सच्या कामासह १९ योजनांचे काम सुरू आहे. त्यातील अनेक योजना निधी न आल्यामुळे थंड बस्त्यात पडून आहेत. शहरातील वादग्रस्त २४ बाय ७ आणि शहर बस सेवा यासाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात निधी मिळाला आहे. याशिवाय सांडपाणी शुद्धीकरणाचा १३२८ कोटीचा प्रकल्प तसेच नागनदी शुद्धीकरणासाठी १२६ कोटीचा प्रस्ताव महापालिकेने केंद्राला सादर केला आहे. २४ बाय ७ योजनेच्या निधी वापरात मोठा गैरव्हवहार झाल्याचा आरोप होत आहे. तसेच स्टार बस संचालन करणाऱ्या वंश निमयला जेएनएनयूआरएमतंर्गत योजनेतील बसेस देण्यातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला आहे.
या पाश्र्वभूमीवर कैलास जोशी यांनी जेएनएनयुआरएम प्रकल्पांतील गैरव्यवहारांची एकही तक्रार संसदीय समितीकडे नसल्याचे विधान करून काँग्रेसच्या प्रयत्नांना शह दिला आहे. समितीने नागनदी शुद्धीकरण, कन्हानमधील वॉटर पंपिंग स्टेशन आणि आनंद टॉकीज परिसरातील भुयारी पूल एवढय़ाच प्रकल्पांना भेट देऊन सायंकाळी प्रयाण केले. ज्या २४ बाय ७ नळ योजनेतील गैरव्यवहारांविषयी मुत्तेमवारांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे, त्या प्रकल्पाबाबत कोणतेही विधान कैलाश जोशी यांच्याकडून करण्यात आले नाही. ही योजना विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनली असतानाच फक्त पॉवर प्रेझेंटेशन करून समितीला याची माहिती देण्यात आल्याने काँग्रेसचा हिरमोड झाला.
वंश निमयला शहर बससेवेचे कंत्राट देण्यात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल समितीचे सदस्य काहीही बोलले नाहीत. दोन्ही योजनांसाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून मोठय़ा प्रमाणावर निधी मिळत असल्याने सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. समिती नागपुरात आली असताना या गैरव्यवहारांविरुद्ध ओरड करणारे मुत्तेमवार मात्र गोव्याला गेल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2013 रोजी प्रकाशित
सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नांना प्रतिशह
महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याच्या खेळीचा एक असलेला जेएनएनयुआरएम संसदीय स्थायी समितीचा एक दिवसाचा दौरा वांझोटा ठरणार असल्याचे कैलाश जोशी यांच्या विधानावरून स्पष्ट झाले. पंचतारांकित हॉटेलात उतरलेल्या समितीच्या सात सदस्यांनी नागपुरात सुरू असलेल्या जेएनएनयुआरएमच्या फक्त तीनच प्रकल्पांना भेट दिली.

First published on: 14-06-2013 at 02:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trying to bring ruling bjp in difficulty chase