आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने घेतला आहे. सोमवारपासून (दि. ३) राज्यभर प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. मात्र, बहिष्कारामुळे लेखी परीक्षेनंतर पुन्हा प्रात्यक्षिक परीक्षा घेता येतील का, याचा विचार परीक्षा मंडळाने सुरू केला आहे.
परीक्षेच्या नियोजनासाठी राज्यातील ८ विभागीय उपसंचालक व ९ विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. ४) शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांसोबत बठक आयोजित केली आहे. गतवर्षी प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी परीक्षेवर बहिष्कार टाकला होता, त्यावेळी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देऊनही मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे प्राध्यापक संतापले आहेत. कोणत्याही स्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.
प्राध्यापकांचा पवित्रा लक्षात घेऊन मंडळाने परीक्षा घेण्यासाठी काय पर्यायी योजना करता येईल? याचा विचार सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. ठरलेल्या वेळी परीक्षा पार पडाव्यात. सरकारने तोडगा न काढल्यास स्वतंत्र यंत्रणा सक्षमरीतीने उभारता येईल का? याचा विचार या बठकीत केला जाणार आहे. मात्र, मंडळ कोणताही विचार करो, मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही, अशी भूमिका प्राध्यापक संघटनेने घेतली आहे. दि. २१ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. तोपर्यंत सरकार काय पावले उचलते, त्यावर विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक अवलंबून राहणार आहे.