विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे १ आणि २ मार्च रोजी विद्रोही साहित्य-सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळील सिद्धार्थ विहारच्या पटांगणावर होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन कवी हसन कमाल करणार असून कवी ज. वि. पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. समिक्षिका पुष्पा भावे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३.०० पासून सुरू होणाऱ्या या संमेलनात मुंबईवरील शाहिरी गाणी, ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि संस्कृतीकर्मीची भूमिका’या विषयावर परिसंवाद पहिल्या दिवशी होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ७.०० वाजता धुरंदर मिठबावकर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कवी संमेलन होणार आहे.  
२ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता शाहिरी जलसा होणार असून त्यानंतर ‘चंगळवाद आणि पर्यायी संस्कृती’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. दुपारी १२.०० वाजता कथावाचन, व त्यानंतर कविता सादरीकरण होईल. संमेलनाच्या निमित्ताने पथनाटय़, छायाचित्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शन आणि नारायण सुर्वे यांच्या जीवनावरील चित्रपटाचेही सादरीकरण होणार आहे. संमेलनाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सुबोध मोरे यांच्याशी ९३२२०२५२६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.