वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचा-यांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे सोलापुरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार ठप्प झाले. यात सुमारे दोनशे कोटींची उलाढाल थांबल्याचे सांगण्यात आले. सकाळी बँक कर्मचा-यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दुचाकी वाहनफेरी काढली. शनिवारची अर्धसुटी व काल रविवारच्या साप्ताहिक सुटीला लागून सुरू झालेल्या या संपामुळे बँकांतील व्यवहार साडेतीन दिवस ठप्प राहणार आहेत. त्याचा फटका सामान्य खातेदार व ग्राहकांना बसला आहे.
सकाळी शेकडो बँक कर्मचा-यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कॅम्प शाखेसमोर एकत्र येऊन नंतर तेथून दुचाकी वाहनफेरी काढली. शक्तिप्रदर्शन करीत ही वाहनफेरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाळीवेस शाखेजवळ येऊन विसर्जित झाली. उद्या मंगळवारी बँक कर्मचा-यांच्या संघटनेने तीव्र निदर्शने करण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, बँक कर्मचा-यांच्या संपाची चाहूल लागताच आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी विविध बँकांच्या एटीएम सेंटरवर ग्राहकांची गर्दी उसळली होती. बऱ्याच एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दुपारनंतर बऱ्याच एटीएम सेंटरमधील रक्कम संपल्यामुळे ग्राहकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. बँक कर्मचा-यांच्या संपामुळे छोटे-मोठे व्यापारी व मध्यमवर्गीय ग्राहकांना दैनंदिन आर्थिक व्यवहार करताना अडचणी आल्या. यात सुमारे दोनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली.