शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला होत असून हा पूल दुचाकी, तीनचाकी वाहनांसह हातगाडी, बैलगाडी व सायकलस्वारांसाठी कायमस्वरूपी बंद राहणार आहे. या उड्डाण पुलाखालील सव्‍‌र्हीस रोडवरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांसाठी प्रती ताशी ४० किलोमीटर वेग निश्चित करण्यात आला आहे. तसेच उड्डाणपूल, त्याखालील सव्‍‌र्हीस रोड आणि या अंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरात कुठेही वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या बाबतची अधिसूचना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी प्रसिद्ध केली असून शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तीन वर्षांपासून चाललेल्या उड्डाणपुलाचे काम नुकतेच पुर्णत्वास आले. या उड्डाणपुलाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी वेगवेगळ्या अधिसूचना प्रसिद्ध केल्या होत्या. वाहतूक नियमनासाठी आधी घालण्यात आलेले सर्व र्निबध रद्द करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. फाळके स्मारक ते क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यानचा उड्डाण पूल शुक्रवारपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होत आहे. या पाश्र्वभूमीवर, उड्डाण पूल व त्याखालून जाणारे सव्‍‌र्हीस रस्ते या संदर्भात वाहतुकीची नियमावली जारी केली आहे. शहर व परिसरातील कोणताही दुचाकी अथवा तीनचाकी वाहनधारक उड्डाणपुलावरून मार्गस्थ होऊ शकणार नाही. या वाहनांना उड्डाणपुलावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हेच र्निबध हातगाडी, बैलगाडी, घोडागाडी व सायकलस्वारांनाही लागू राहतील, असे पोलीस आयुक्तांनी सूचित केले आहे. उड्डाणपुलालगत दोन सव्‍‌र्हीस रस्ते असून त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांसाठी प्रतीताशी ४० किलोमीटर वेग निश्चित करण्यात आला आहे. यापेक्षा अधिक वेगाने मार्गस्थ होणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
महामार्गावरील उड्डाणपूल, त्याखालील दोन्ही सव्‍‌र्हीस रस्ते व त्यांच्या अंतर्गत येणारा सर्व परिसर या ठिकाणी कोणतीही वाहने उभी करता येणार नाहीत. हा संपूर्ण परिसर ‘नो पार्किंग झोन’ राहणार आहे. असल्याचे सरंगल यांनी म्हटले आहे.