जिल्हय़ातील उदगीर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तिरू धरणावरून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हय़ातील पाणीपुरवठय़ासंबंधी मुंबईत बैठक घेण्यात आली. उदगीर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणारी योजना नाही. त्यामुळे शहरात पाणीटंचाई आहे. शहराजवळ असलेल्या तिरू धरणातून पाणीपुरवठा केल्यास शहराचा पाणीप्रश्न सुटू शकतो. याबाबत पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. मांजरा नदीवर पाणी अडविण्यास बंधारे बांधण्यात आले व पाणीही अडले आहे. या बंधाऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्यांना त्यांचा मावेजा अद्यापा मिळाला नाही. त्यामुळे या जमिनीवर पाणी अडवता येत नाही. बंधाऱ्यातील पाण्याची साठवणूक पूर्ण क्षमतेने केली जात नाही. शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मावेजा दिल्यास प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी अडवता येईल. जमिनीचा मावेजा तातडीने देण्याची सूचना बैठकीत आमदार देशमुख यांनी केली.