केंद्र शासनाच्या ‘स्टार कॉलेज’ अंतर्गत समावेश झालेल्या येथील जानकीदेवी बजाज (जे.बी.सायन्स) विज्ञान महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘अ’ दर्जा प्रदान केला असून मुंबई वगळता उर्वरित राज्यात असा दर्जा प्राप्त करणारे हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे.     
प्रसिध्द उद्योजक राहुल बजाज अध्यक्ष असलेल्या शिक्षा मंडलद्वारे संचालित व ऐतिहासिक स्वातंत्र्य आंदोलनाचा वारसा लाभलेल्या भूमीवर उभारण्यात आलेल्या या विज्ञान महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचे उच्चतम मापदंड आता सर केले आहेत. शिक्षणक्षेत्रात कार्यरत प्रत्येक संस्थेचे ‘अ’ दर्जा प्राप्त करण्याचे सर्वोच्च उद्दिष्टय़ असते. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विविध कसोटय़ांवर सवरेत्कृष्ट ठरलेल्या या महाविद्यालयाने मूल्यांकनाच्या क्रमवारीत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला.
प्राचार्य डॉ.ओम महोदय म्हणाले, या महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा पाहून विदर्भातीलच नव्हे, तर बाहेरूनही विद्यार्थी संशोधनकार्यासाठी प्रवेश घेतात.  यापूर्वी महाविद्यालयास २०१० मध्ये युजीसीतर्फे  ‘उत्कृष्ट क्षमताशील महाविद्यालया’चा, तसेच २०१३ मध्ये केंद्र शासनाच्या स्टार कॉलेजचा बहुमान प्राप्त झाला आहे.