कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी मतदार गणना, अर्थ गणनेच्या कामात गढलेले असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही जाहीर झाली. या निवडणुकांच्या कामात प्रमुख अधिकारी व्रग्य झाल्याने कल्याण डोंबिवलीतील भूमाफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून शहरातील  मोकळ्या तसेच सरकारी जमिनींवर अनधिकृत चाळी, इमारती उभारण्याचा सपाटा सुरू झाला आहे. अशा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या मध्यंतरी आयुक्त शंकर भिसे यांनी बदल्या केल्या होत्या. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या प्रभाग अधिकाऱ्यांनी ही बांधकामे काही प्रमाणात थांबवली होती. या पाश्र्वभूमीवर निवडणुक कामाचे निमीत्त साधत अतिक्रमण पथकातील प्रमुख अधिकारी अचानक व्यग्र झाल्याने भूमाफियांचे फावले आहे.  
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिका कर्मचारी जात तसेच अर्थ गणनेच्या कामात गढून गेले होते. हे काम संपते ना संपते तोच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आयोगाची काही बंधने आली आहेत. याचा लाभ उठवत भूमाफियांनी पुन्हा जोमाने आयरे, भोपर, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, रेतीबंदर, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, कुंभारखाण पाडा, गरीबाचापाडा, नवापाडा, कल्याणमधील कोळसेवाडी, काटेमानिवली, खडेगोळवली, टिटवाळा, मोहने, आंबिवली, बल्याणी भागात नव्याने अनधिकृत बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांना महापालिका कर्मचारी, अधिकारी यांचाही आशीर्वाद असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येते. पहाटे तीन ते सहा या वेळेत बांधकामाच्या ठिकाणी रेतीचे ट्रक रिकामे केले जातात. त्यानंतर दिवस-रात्र पाळी पध्दतीने ही
अनधिकृत बांधकामे भूमाफियांकडून उभारण्यात येत आहेत. या बांधकामांमध्ये स्थानिक नगरसेवक, अधिकारी, मध्यस्थ यांनाही घरपोच ‘वाटा’ मिळत असल्याने तेही या विषयी गुपचिळी धरून आहेत. नगरसेविका कविता म्हात्रे यांनी आचारसंहितेच्या काळात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे व त्यावर असलेले प्रशासनाचे मौन याविषयी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना एक पत्र देऊन तातडीने या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आचारसिहतेच्या काळात महापालिकेत राजकीय हस्तक्षेप तुलनेने कमी असतो. त्यामुळे या काळात अधिकाऱ्यांना काम करण्यास पुरेसा वाव असतो. अशा काळात शहरातील फेरीवाले, बेकायदा बांधकामाविरोधात जोरदार मोहीम हाती घेणे प्रशासनाला शक्य असते. मात्र, याच काळात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामांची उभारणी सुरु असल्यामुळे कल्याण, डोंबिवली शहरात नाराजीचा सुर व्यक्त होत आहे. आचारसिहतेच्या कामाचे निमीत्त पुढे करुन या बांधकामांकडे डोळेझाक सुरु असल्याने काही अधिकाऱ्यांचे चांगले फावले असून हा काळ भूमाफियांच्याही पथ्यावर पडला आहे.