नैसर्गिक आपत्तीचे संकट व दुष्काळाचा सामना शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना कसा सोसावा लागतो, याचा प्रत्यक्ष अनुभव, समस्यांची जाण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या दुष्काळग्रस्त भागात झालेल्या संवाद पदयात्रेत जवळून अनुभवता आल्याची माहिती अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित झनक यांनी रिसोडच्या विश्रामगृहावर दिली.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील पाहणी करून शेतकरी, कष्टकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासन दरबारी मांडण्यासाठी संवाद पदयात्रा ११ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत काढण्यात आली होती. पदयात्रेची सुरुवात बुलढाणा जिल्ह्य़ातून राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस अभिवादन करून करण्यात आली होती. जालना, औरंगाबाद, बिड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्य़ातून युवक काँग्रेसचे पदाधिकारी पायी चालून प्रत्यक्ष दुष्काळाची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन संवाद साधला.
५०० कि.मी. अंतर २४ दिवसात पायी चालून सांगली जिल्ह्य़ातील भिवेघाट येथे पदयात्रेचा समारोप ५ मार्चला झाला. या पदयात्रेसोबत अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित झनक व पदाधिकारी सहभागी झाले होते.
या पदयात्रेत नैसर्गिक आपत्ती काय असते. दुष्काळाला नागरिक कसे तोंड देतात, हे जवळून पाहता आल्याने ही पदयात्रा आयुष्यात अविस्मणीय ठरल्याचे झनक यांनी सांगितले. दरम्यान, २५ फेब्रवारी रोजी बार्शी येथे राहुल गांधी यांनी व्हीडिओ काँफरन्सव्दारे मोजक्या युवकांशी थेट संवाद साधला. यात अमित झनक यांचा समावेश होता.