हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; फळबागा उद्ध्वस्त
लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांची तयारी जोमात सुरू झाली असताना विदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिकांच्या झालेल्या जबर नुकसानीकडे नेत्यांचे आणि प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. ज्या दिवशी वादळी पाऊस झाला त्याच दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत जिल्ह्य़ात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर प्राथमिक तपासणीत शहरात आणि जिल्ह्य़ात मोठय़ा शेतीचे आणि लोकांच्या घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अवकाळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

शेतातून काढलेल्या पिकांचे आणि शेतात असलेल्या उभ्या पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्य़ात २५० कोटींचे तर शहरात २५ कोटींचे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांना पाऊस-गारपिटीने जबर तडाखा दिला. राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विदर्भासाठी काय घोषणा केली जाते? याकडे लक्ष लागले आहे.
नागपूरसह पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम वर्धा, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्य़ाच्या काही भागात दोन दिवसांपूर्वी अचानक अवकाळी वादळी पाऊस झाला. पावसाने ग्रामीण आणि शहरात झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे. जिल्हाधिकाही अभिषेक कृष्णा यांनी शहराचा आणि जिल्ह्य़ाचा नुकताच आढावा घेतला असून त्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर जिल्ह्य़ात कामठी, सावनेर, कळनेश्वर मौदा, कुही काटोल नरखेड रामटेक पारशिवणी, हिंगणा आणि नागपूर तालुक्यांमध्ये वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. कामठी, सावनेर, कुही, काटोल, नरखेड, रामटेक या भागात पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून कठीण परिस्थितीतून सावरलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
जिल्ह्य़ात आणि शहरात घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली झाल्याने संपत्तीची हानीदेखील मोठय़ा प्रमाणात आहे. पुढील काही दिवसात पुन्हा वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हातातोंडाशी आलेले पीक पावसाने शेतक ऱ्यांपासून हिरावून घेतले आहे. पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान काढणीवर आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी तसेच आंबा, मोसंबी आणि संत्र्याच्या बागांना पोहोचले आहे. गहू तर पूर्णपणे जमीनदोस्त झाला.
जिल्हा सहकारी बँका आणि त्यांच्या शाखा या शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळटाळ करीत आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत. शहरात विविध मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झोपडपट्टीतील लोकांचे नुकसान झाले आहे. महापालिकेची अत्यावश्यक सेवा अनेक ठिकाणी वेळेवर पोहोचली नसल्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लगत आहे.
शेतातील भाज्या हातच्या गेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणून ठेवलेला माल भिजल्याने निकामी झाला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांत विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. दुरुस्तीची कामे गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहेत. आंब्याला आलेला मोहोर गळून पडल्यामुळे आंब्याच्या बागा ओसाड झाल्या. या परिस्थितीत महसूल यंत्रणेने एकरी हानीची आकडेवारी काढून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता असताना यंत्रणा गाफील आहे. एकरी २० हजार ते ३० हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी सरकारी मदतीच्या आशेवर आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण महसूल खात्याने सुरू केले असून नुकसानाचा अंदाज लवकरच आकडेवारीसह आपत्ती विभागाला प्राप्त होईल. त्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल, असे महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.