टोकाच्या राजकीय संघर्षांमुळे मागे पडलेल्या मराठवाडय़ाच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
येथील पीपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश देवडा यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त नागरी बँकांसाठी परिसंवादाचे आयोजन केले होते. चव्हाण यांच्या हस्ते या वेळी कोअर बँकिंग प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, ओमप्रकाश पोखर्णा, अमरनाथ राजुरकर, खासदार सुभाष वानखेडे, विलास गुंडेवार, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवाजीराव माने आदी उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा यांनी नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली.
चव्हाण म्हणाले, की राजकारणात वैयक्तिक भांडण नाही. मराठवाडय़ात टोकाचा राजकीय संघर्ष असल्याने मराठवाडा विकासाच्या दृष्टीने मागे पडला, हे येथील जनतेला परवडणारे नाही. प्रत्येकाने पक्षभेद बाजूला ठेवून मराठवाडय़ावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र आले पाहिजे. आपल्यात राजकीय संघर्ष कितीही मोठे असले, तरी विकासाच्या मुद्दय़ावर सामोपचाराने प्रश्न सोडविले पाहिजेत. देवडा यांच्या परिश्रमातून पीपल्स बँकेने लौकिकप्राप्त कामगिरी केल्याचे गौरवपूर्ण उद्गारही त्यांनी काढले.