राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना न जुमानता कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणात भाग घेतला. महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठाचा वाढीव पदासहीत आकृतीबंध आढावा मंजूर करण्यात आला परंतु, नागपूर विद्यापीठाच्या चुकीमुळे आकृतीबंध आढाव्यात वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची पदे कमी करून केवळ अधिकाऱ्यांची पदे वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजपासून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही पदोन्नती देण्यात आली. अशा कर्मचाऱ्यांना पदावनत करून प्रलंबित पदोन्नतीची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली त्वरित मंजूर करण्यात यावी. विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व निवड प्रक्रियेची नियमावली अस्तित्वात नसताना देण्यात आलेल्या पदोन्नत्या व नियुक्तया त्वरित रद्द करण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांच्या वेतनतील तफावत व पदनाम दुरुस्ती केली जावी, अशी मागणी या आंदोलनामागे आहे.
दरम्यान, विद्यापीठाने आंदोलनात भाग घेणे गैरवर्तणुकीची बाब ठरवली असून त्यात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. उन्हाळी परीक्षेचा पुढचा टप्पा उद्या, पाच एप्रिलपासून सुरू होत असून कामाचा खोळंबा निर्माण झाल्यास महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४मधील कलम ३२(५)(जी)नुसार कारवाई करण्यात येईल, असे कुलसचिवांच्या आदेशाचे परिपत्रक सर्व विभाग प्रमुख, विद्यापीठ संचालित प्राचार्य व संचालक आणि इतरांना कळवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांची मागण्या नियमांना धरून नसून त्यांच्यासाठी विद्यापीठ पातळीवर जे करता येईल, ते केले आहे. आता प्रकरण शासनाच्या हाती असून येथे आंदोलन करून उगीच परीक्षेच्या कामाचा खोळंबा करणे चुकीचे आहे. आंदोलन करणारे स्वत: तरी प्रामाणिकपणे त्यांचे काम करतात का? असा सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे. केवळ तीनच लोकांना आंदोलनाची परवानगी असताना इतर लोक आंदोलनकर्त्यांमध्ये सामील कसे झाले, याची शहानिशा केली जात आहे. नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघाचे सतिश होले, नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे दिनेश दखने आणि नागपूर विद्यापीठ शिक्षकेतर सेवक संघाचे गजेंद्र कुकडे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे.