राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा विधिसभा सदस्य आणि अभाविपच्या आंदोलनामुळे आजपासून सुरू झालेल्या परीक्षांच्या कामांवर प्राध्यापकांच्या आंदोलनाचा काहीही परिणाम होत्या त्या सुरळीत पार पडल्या. प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे परीक्षा पद्धत कोलमडून पडेल, अशी प्राध्यापकांच्या संघटनांना अपेक्षा असताना आंदोलनातील प्राध्यापकही आज परीक्षा घेण्यासाठी सरसावले. ज्या महाविद्यालयात त्यांनी परीक्षा घेण्यास नकार दिला, त्या महाविद्यालयात समांतर पद्धत प्राचार्यानी व्यवस्थित पार पडल्याचा निर्वाळा दिला आहे. आज बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षांच्या परीक्षा होत्या. सोबतच बीपीएड, इंग्रजी आणि इतरही भाषांच्या परीक्षा होत्या.
कॉन्ट्रिब्युटरी शिक्षक, पीएच.डी.धारक, नेट-सेटधारक आदींना या परीक्षेच्या कामात सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे याही लोकांना रोजगार मिळाल्याचा आनंद प्राचार्यानी व्यक्त केला. शासनाच्या निर्णयामुळे केवळ प्राचार्यावर मोठी जबाबदारी आली. पूर्वी एखाद्या ज्येष्ठ प्राध्यापकावर कामे सोपवून प्राचार्य प्रशासकीय कामे सांभाळत असत. मात्र आज सह्य़ांपासून प्रश्नपत्रिकेची पाकिटे पोडण्याचे कामही प्राचार्याना करावे लागले. परीक्षेला इनव्हिजिलेटर कोण राहणार हा प्रश्न होता. मात्र परीक्षा घ्यायच्याच असल्याने त्याही समस्येवर तोडगा काढण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम थोटे आणि प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी लेखी परीक्षा तर सुरळीत पार पडतील पण प्रात्यक्षिक परीक्षा न झाल्याने त्यांच्या गुणांअभावी परीक्षेचे निकाल अडकून राहतील, अशी भीतीही भुस्कुटे यांनी व्यक्त केली.
सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, आलापल्ली या भागातही परीक्षा सुरळीत पार पडल्याचे डॉ. थोटे म्हणाले. कला, वाणिज्य, विज्ञान, शारीरिक शिक्षण आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्याचे वाङ्मय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. शरयू तायवाडे, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भरत मेघे, विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. किशोर देशमुख, समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भूपेश चिकटे यांनी सांगितले. कोणत्याच परीक्षेत काही गोंधळ नसल्याची त्यांची माहिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2013 रोजी प्रकाशित
विद्यापीठाच्या परीक्षा अखेर मार्गी; प्राध्यापक आंदोलनाचे तीनतेरा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा विधिसभा सदस्य आणि अभाविपच्या आंदोलनामुळे आजपासून सुरू झालेल्या परीक्षांच्या कामांवर प्राध्यापकांच्या आंदोलनाचा काहीही परिणाम होत्या त्या सुरळीत पार पडल्या.

First published on: 13-04-2013 at 03:23 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University examination begins at the last teachers agitation broken