मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राच्या बांधकामाला विद्यापीठाने सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेने कल्याणमधील गंधारे येथे नाममात्र दराने मुंबई विद्यापीठाला जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र गेल्या सात वर्षांपासून विद्यापीठ व्यवस्थापन जागेवर बांधकाम करण्यास दिरंगाई करीत असल्याने शिवसेनेने पालिकेची जागा परत करण्याची मागणी दोन महिन्यांपूर्वी राज्याचे राज्यपाल व विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली होती.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेली या जमिनीची नस्ती विद्यापीठाच्या ताब्यात आल्यानंतर तातडीने उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांनी शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र पाटील, सचिन बासरे, सुनील वायले, राजेंद्र देवळेकर, प्रकाश पेणकर, विजय साळवी आदींना दिले होते. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. आचारसंहिता संपताच विद्यापीठाने कल्याण उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात केली असल्याची माहिती नगरसेवक रवींद्र पाटील यांनी दिली.
कल्याण, शहापूर, मुरबाड, वाडा, भिवंडी, डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून कल्याणजवळ विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी महापालिकेने सात वर्षांपूर्वी गंधारे येथील पालिकेची सात एकर जागा नाममात्र दराने विद्यापीठ व्यवस्थापनाकडे हस्तांतरित केली होती. विद्यापीठाने त्या वेळी तात्काळ या जागेवर संकुल उभे करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सात वर्षे उलटली तरी विद्यापीठ काहीच हालचाल करीत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्या भेटी घेऊन विद्यापीठाला कल्याण उपकेंद्र सुरू करायची इच्छा नसल्यास ती जागा पालिकेला परत करण्याची मागणी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्राचे काम सुरू
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राच्या बांधकामाला विद्यापीठाने सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेने कल्याणमधील गंधारे येथे नाममात्र दराने मुंबई विद्यापीठाला
First published on: 04-11-2014 at 07:07 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University of mumbai welfare sub work started