आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा
मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांमधील बायोमेट्रिक यंत्रणा शोभेची बनली असून सुमारे १३५ मशीन्स बंद असल्याने या यंत्रणेवर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हजेरी नोंदणीसाठी बंधनकारक असलेल्या बायोमेट्रिक पद्धतीत सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी ज्या उद्देशाने ही यंत्रणा लावण्यात आली तो उद्देशच आता बाजूला पडला आहे.
मेळघाटात २२ शासकीय आणि १२ अनुदानित आश्रमशाळा आहेत. मेळघाटसह राज्यात आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बोगस पटनोंदणीला आळा घालण्यासाठी, तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यासाठी लाखो रुपये खर्चून बायोमेट्रिक यंत्रणा उभारण्यात आली, पण एका वर्षांतच ही यंत्रे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या हजेरीची नोंद घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत चांगली शिक्षण सुविधा पुरवली जाईल, हा उद्देश ठेवण्यात आला, पण सुरुवातीपासूनच या यंत्रणेला अन्य यंत्रणांच्या अपुरेपणाचा फटका बसला.
बऱ्याच शाळा दुर्गम भागात असल्याने आणि त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसल्याने ही यंत्रे कुचकामी ठरली. या यंत्रणेच्या माध्यमातून आदिवासी प्रकल्प कार्यालयाला आणि तेथून आदिवासी विकास विभागाला विद्यार्थ्यांच्या, तसेच शिक्षकांच्या हजेरीची दैनंदिन माहिती पाठविण्यात येणार होती, पण सुविधाच उपलब्ध नसल्याने आता ही यंत्रे धूळ खात पडली आहेत.
मध्यंतरी काही आश्रमशाळांच्या संचालकांनी विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटले होते. यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. या प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच आश्रमशाळांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या वर्षी आदिवासी विकास विभागाने सरकारी व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, पण तो घेताना बायोमेट्रिक यंत्रांसाठी लागणारा सलग वीजपुरवठा, इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे की नाही, याची चाचपणी करण्यात आली नाही. परिणामी, ही यंत्रणा अनेक ठिकाणी पहिल्या दिवसांपासूनच फोल ठरली.

दिवाळीनंतर बरेच विद्यार्थी गायब
या आश्रमशाळांना पुरवण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रांच्या दर्जाविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, पण आता ही यंत्रेच बंद असल्याने दर्जाविषयक प्रश्न सुटल्याचे समाधान आदिवासी विभागाला लाभले आहे. मेळघाटातील अनेक आदिवासी आश्रमशाळांमध्ये बरेचशे विद्यार्थी अजूनही दिवाळीच्या सुटीनंतर शाळेत परतलेले नाहीत. त्यांच्या उपस्थितीची चिंता कुणाला नाही. मेळघाटातील शिक्षण व्यवस्थेचे हे विदारक चित्र असून शिक्षकही शिकवण्यात उत्साह दाखवत नाहीत. शिक्षकांच्या हजेरीची बायोमेट्रिक व्यवस्था नसल्याने शिक्षकांचेही फावले आहे, असे मत ‘खोज’ संस्थेचे अ‍ॅड. बंडय़ा साने यांनी व्यक्त केले.
मेळघाटातील आश्रमशाळांमधील गैरसुविधांविषयी आधीच बरीचशी चर्चा झाली आहे. बायोमेट्रिक प्रणालीमुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढेल आणि आश्रमशाळांना शिस्त लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, पण ही यंत्रेच आता बंद पडल्याने मार्गच खुंटले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, अशीच आमची अपेक्षा आहे, असे अ‍ॅड. साने म्हणाले.