विविध संशोधन संस्थांनी अंतराळात पाठवलेले उपग्रह मोठय़ा प्रमाणात निकामी झाले आहेत. हे निकामी उपग्रह अवकाशातील एका भागात साठवण्यात येतात. पृथ्वीच्या परिक्रमेसोबत या कचऱ्याची स्थिती बदलते. हा कचरा सध्या नागपूरच्या आकाशात आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी दिली.
नागपुरातील एका महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ‘स्पेस ओडिसी’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आलेले पद्मविभूषण डॉ. कस्तुरीरंगन प्रसार माध्यमांशी वार्तालाप करत होते. भारत अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असून आपल्याला कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आतापर्यंत भारताने १५ दळणवळण उपग्रह अंतराळात पाठवले असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
फार चिंता करावी अशी परिस्थिती सध्या अंतराळात निर्माण झालेली नाही. परंतु भविष्याचा विचार करता, निकामी झालेले उपग्रह नष्ट करण्यासाठी प्रत्येक देशातील अंतराळ संशोधन संस्थेने प्रयत्न करायला हवेत. उपग्रहांमध्ये काही प्रमाणात इंधन वाचवून ठेवणे आणि त्याचा उपयोग करून उपग्रह नष्ट करणे हा त्यासाठीचा एक उपाय आहे. तीव्र लेझर किरणांचा मारा करून किंवा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात आणूनही हे उपग्रह नष्ट करता येतील, असे कस्तुरीरंगन यांनी सांगितले.
पाण्याची समस्या सध्या सर्वानाच भेडसावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळून आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करून शेती करावी, अशी सूचना योजना आयोगाचे सदस्य असलेले डॉ. कस्तुरीरंगन यांनी केली. शासनाच्या विविध यंत्रणांनीही शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती द्यावी, तसेच पाण्याच्या व्यवस्थापनाबाबतही मार्गदर्शन करावे, जेणेकरून शेती आणि पिकाचे नुकसान होणार नाही. मान्सूनबाबत शेतकरी आजही पारंपरिक पद्धतींचा उपयोग करतात, हे लक्षात घेऊन हवामान खात्याने वेळोवेळी शेतकऱ्यांना हवामानाबाबत माहिती द्यावी असा सल्ला त्यांनी दिला.
विदर्भात नैसर्गिक संसाधने मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. संत्र्याच्या उत्पादनासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्नियापेक्षा विदर्भातील वातावरण पोषक असल्याने तिथल्यापेक्षा चांगली संत्री नागपुरात होऊ शकतात. त्यासाठी वैज्ञानिकांनी पुढाकार घेऊन योग्य तंत्रज्ञान विकसित करायला हवे, असे मत कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले. विदर्भातील वन, कोळसा आणि खनिजांचा योग्य वापर केल्यास या भागाची भरभराट होईल, असेही ते म्हणाले.
इस्रोची मंगळ मोहीम
अमेरिका, जपान आणि रशिया यांनी आतापर्यंत राबवलेल्या मंगळ मोहिमेत विशेष काही हाती लागले नाही. मात्र इस्रोने हाती घेतलेली मंगळ मोहीम त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. मंगळावर पाठवण्यात येणाऱ्या उपग्रहामुळे देशासाठी उपयुक्त अशी बरीच माहिती मिळेल. ही मोहीम म्हणजे भारतीय संशोधकांसाठी महत्त्वाचा अनुभव राहील. या मोहिमेमुळे इस्रोला जागतिक पातळीवर नवी उंची मिळणार असून त्याचा लाभ चांद्रयान मोहिमेलाही होईल, असे कस्तुरीरंगन यांनी सांगितले. स्वत: कस्तुरीरंगन यांनी सुरुवातीला मंगळ मोहिमेपेक्षा चांद्रयान मोहीम महत्त्वाची असल्याची भूमिका घेऊन भारताच्या मंगळ मोहिमेला अप्रत्यक्षरित्या विरोध केला होता.