तबलावादनातील उस्ताद अल्लारखाँ यांच्या १४ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘उस्ताद अल्लारखाँ इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक’तर्फे ३ फेब्रुवारी रोजी षण्मुखानंद सभागृहात भव्य संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. तबला गुरू आणि त्यांचे शिष्य यांच्या सादरीकरणाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
संगीत सोहळ्याची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता तबला गुरू आणि त्यांचे शिष्य यांच्या ‘ताल प्रणामा’ने होणार आहे. त्यानंतर अभिषेक रघुराम यांचे गायन होणार असून त्यांना अक्काराई सुब्बलक्ष्मी (व्हायोलिन) आणि अर्जुनकुमार (मृदंगम) संगीतसाथ करणार आहेत. सकाळच्या या सत्राचा समारोप एन. राजम आणि झाकिर हुसेन यांच्या मैफलीने होणार आहे.
दुपारच्या सत्रात ‘ताल तपस्या’ हा कार्यक्रम होणार असून यात उस्ताद अल्लारखाँना आदरांजली वाहण्यात येणार आहे. या वेळी सदानंद नायमपल्ली आणि सत्यजित तळवलकर यांचे तबला वादन होणार असून त्यानंतर अनंत आर. कृष्णन यांचे मृदुंगवादन आणि ढोलवादन हा कार्यक्रम होणार आहे.   
सायंकाळी होणाऱ्या ‘सेलिब्रेशन’ या सत्रात जगप्रसिद्ध ड्रमवादक जॉन यांचा खास कार्यक्रम तसेच कोलकोता आणि पुणे येथील ढोलवादक आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाची सांगता झाकिर हुसेन यांच्या तबलावादनाने होणार आहे. या वेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही कलाकार सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे. प्रतिव्यक्ती केवळ दोन विनामूल्य प्रवेशिका दिल्या जाणार आहेत. या प्रवेशिका प्रत्येक सत्राच्या आधी दोन तास दिल्या जातील, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.