शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गेल्या वर्षभरात भाषणात दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे ३० नोव्हेंबरला त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला विदर्भातील विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीने समर्थन जाहीर केले आहे. शेतकरी संघटनेने पुकारलेले ठिय्या आंदोलन विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय शेतकरी संघटना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने आहे. म्हणून या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पाठिंबा आहे व समितीचे संपूर्ण विदर्भवादी कार्यकर्ते या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होतील, असे समितीतर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आले.
सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे देशातील एकूणच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. विदर्भातील शेतकरी तर हवालदिल झाला आहे. विदर्भातील अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे धान, सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालास रास्त भाव न देण्याचे धोरण सरकारचे आहे.
यामुळे विदर्भातील कापूस, सोयाबीन, धान, संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला असून विदर्भात आतापर्यंत ३४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
विदर्भातील जमीन सुपीक असून बारमाही मोठय़ा नद्या येथे आहे. परंतु सरकारच्या विदर्भविरोधी धोरणामुळे लहान- मोठे धरणे ३०-४० वर्षांपर्यंत पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे विदर्भातील शेती फक्त १५ टक्क्यांपर्यंत सिंचनाखाली आली आहे.
दुसरीकडे शेतमालास भाव न मिळू देणारी व्यवस्था कार्यरत असल्याने कापूस, सोयाबीन, धान, संत्रा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आणि आत्महत्या करू लागला. सोबतच विदर्भाची ग्रामीण अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राम नेवले यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील ठिय्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गेल्या वर्षभरात भाषणात दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे ३० नोव्हेंबरला त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे.
First published on: 27-11-2014 at 01:22 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various organizations support protest in front of the chief minister residence