आजाराची लक्षणे पाहून त्यावरील उपचाराची दिशा ठरवण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक लूट करण्यासाठीच डॉक्टर्स विविध चाचण्या करावयास लावतात, हा आरोप हास्यास्पद असून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वास निर्माण होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत इंडियन मेडिकल असोसिएशन, शाखा नागपूरचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे आणि माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.
बुधवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विविध मुद्दय़ांना स्पर्श करीत आयएमएची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून त्याचे दुष्परिणाम जनतेलाच भोगावे लागणार आहेत. ज्यांनी ज्या पॅथीची डिग्री घेतली, त्याच पॅथीत प्रॅक्टीस करणे आवश्यक आहे. परंतु बीएचएमएस व बीएएमएसची पदवी घेणाऱ्यांमध्ये आपण करीत असलेल्या औषधोपचारांमुळे रुग्णाला लाभ होईल, याचा आत्मविश्वासच नसतो. त्यामुळे ते अॅलोपॅथीकडे धाव घेतात. आयएमएचा कोणत्याही पॅथीला विरोध नाही. अॅलोपॅथीमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी आहे, म्हणून होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचे उपचार करण्यास परवानगी देणे संयुक्तिक नाही. तसे वाटत असेल तर शासनाने होमिओपॅथी महाविद्यालये बंद करून अॅलोपॅथीचे महाविद्यालय सुरू करावे.
अॅलोपॅथीचे उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्टरांच्या तपासणी व अन्य उपचाराचे शुल्क सारखे नाही, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, डॉक्टरांनी आपल्या कौशल्यानुसार रुग्णालये स्थापन केली असून तेथे रुग्णाला उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचाही वापर केला जातो. रुग्णालयात असलेल्या पायाभूत सोयीवरून रुग्णांकडून रक्कम आकारली जाते. याबाबत समाजामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. खरे म्हणजे, लोकांना आरोग्य सेवा देणे हे शासनाचे काम आहे. परंतु सरकारी रुग्णालयांची स्थिती कशी आहे, हे सांगण्याची काही गरज नाही. शासकीय रुग्णालयात योग्य व वेळेवर उपचार होणार नाही, असे वाटते तेव्हा रुग्ण खासगी रुग्णालयांकडे वळतो. जवळपास ७५ टक्के नागरिक खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतात. असे असताना शासन व समाजही डॉक्टरांना वेगळ्या भूमिकेतून बघत असतो. त्यामुळे आयएमए शासनाच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करीत असतो, त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
आमच्यामध्ये काही डॉक्टर चुकीचे काम करतात म्हणून सर्वच डॉक्टर वाईट आहेत, असे ठरवणे हे अयोग्य ठरेल. काही ठराविक डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा डागाळली आहे. जे डॉक्टर सामान्य नागरिकांची लुबाडणूक करतात त्यांना शोधून काढून त्यांच्यावर बंदी घालण्याची कडक भूमिका आयएमएने घेतली आहे. आयएमए यापूर्वी आणि आताही कटप्रॅक्टीसच्या विरोधात आहे.
नागपुरात ‘एम्स’ होणार असल्याने पदवी आणि पदव्युत्तरच्या जागा वाढतील. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राला त्याचा लाभ होईल. जैविक कचऱ्याबद्दल महापालिका डॉक्टरांवर कारवाई करीत असल्याचा आयएमएचा स्पष्ट आरोप आहे. जेवढे किराणा दुकान महत्त्वाचे तेवढेच समाजातही डॉक्टर महत्त्वाचे आहे. सध्या स्वाईन फ्लूचा उद्रेक असून सामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये. खोकला, पडसे, नाकातून पाणी वाहणे आदी लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या रुग्णालयात जावे, असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला. आयएमएची नागपूर शाखा त्यादृष्टीने जनजागृती करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2015 रोजी प्रकाशित
उपचाराची दिशा ठरवण्यासाठी विविध चाचण्या आवश्यक
आजाराची लक्षणे पाहून त्यावरील उपचाराची दिशा ठरवण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

First published on: 12-03-2015 at 06:51 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various tests necessary to decide the type of treatment