महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वेगळ्या विदर्भवाद्यांनी आंदोलनांची दिशा ठरवली असून काळे झेंडे लावून विरोध करण्याची तयारी दर्शवली आहे तर काहींनी चंडिका मातेचे पूजन करून धरणे देण्याचे ठरवले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने १ मे रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या वैभवशाली विदर्भाला महाराष्ट्रात सामील करून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सरकार साजरा करते तो दिवस विदर्भावर अन्यायकारक ठरला आहे. खनिज संपत्तीने संपन्न विदर्भाला महाराष्ट्रवाद्यांनी कंगाल केले. विदर्भात मोठय़ा प्रमाणात विजेची निर्मिती करून विदर्भाला प्रदूषित करून याठिकाणी भारनियमन केले जाते. म्हणूनच विदर्भ विकासाचा अनुशेष वर्षांनुवर्षे कायम आहे. विदर्भवाद्यांनी घरावर काळे झेंडे लावून, हातावर काळी पट्टी लावून महाराष्ट्र दिवसाचा निषेध करून काळा दिवस पाळावा, असे आवाहन आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
धरणे, निदर्शने जमेल ते आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी दिला आहे. कँडलमार्चसाठी अमरावतीचे विक्रम बोके, उमेश चौबे, माजी पोलीस महासंचालक प्रवीण चक्रवर्ती, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, राजकुमार तिरपुडे, अ‍ॅड. नंदा पराते, रविकांत खोब्रागडे आणि गणेश शर्मा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर, यवतमाळ, पांढरकवडा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियातील कार्यकर्त्यांसह नागपूर जिल्हा ग्रामीणमधून वेगळ्या विदर्भासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने विदर्भ राज्य संघर्ष समितीने शहीद चौकात विदर्भ चंडिका मंडपात १ मे रोजी सकाळी १० ते पाचपर्यंत धरणे देऊन चंदिका मातेचे पूजन करण्याचे ठरवले आहे. विदर्भ राज्याकरिता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. राजकीय पक्ष व इतर नेत्यांनी अनेक प्रकारची आंदोलने केली, पण आश्वासनामुळे स्वार्थापोटी वेगळा विदर्भ होऊ शकला नसल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष अण्णा राजेधर यांनी व्यक्त केला आहे. स्वार्थी नेत्यांमुळेच विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येस सरकार प्रवृत्त करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.