राज्याचे मुख्यमंत्रीपद सर्वात जास्त काळ विदर्भाकडे होते. पूर्व व पश्चिम विदर्भात किती मंत्री, खासदार, आमदार आहेत, त्यांनी किती प्रकल्प विदर्भात आणले अथवा किती प्रकल्प स्वत: उभे केले?. विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी विदर्भाच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती, तसेच त्यांनी विकासाभिमूख दृष्टी असलेली माणसे सुद्धा उभी करायला पाहिजे होती, पण त्यांनी केली नाहीत. विदर्भातील नेत्यांनीच विदर्भाला उपेक्षित ठेवल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी सायंकाळी मनसेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर येथील मणिप्रभा हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, विदर्भाचा विचार करत असताना कोणी बोहरून येऊन विकास करेल, या भ्रमात जनतेने राहू नये. आपल्या लोकप्रतिनिधींना याबाबत जाब विचारावा. ज्यांनी सत्ता भोगली त्यांनीच विदर्भात विकासाची गंगा आणायला पाहिजे होती. विकास होत नसतांनाही पुन्हा-पुन्हा ‘तिच ती’ माणसे कशी निवडून येतात, असा प्रश्न उपस्थित करून जनतेचा लोकप्रतिनिधींवर वचक राहिला नसल्याचा आरोपही यावेळी राज ठाकरे यांनी केला.
विदर्भ व मराठवाडय़ावर अन्याय होत असल्याचा आरोप जनतेकडून केला जातो. या दोन्ही विभागातील नेत्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ उपभोगला आहे. विकास केंद्रित नसावा तो सर्वसमावेशक असावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ व मराठवाडय़ासह संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वागिण विकासाचे ध्येय आहे. देशात आपले राज्य ताठ मानेने उभे राहावे, यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्र आपला मतदार संघ समजतो, असा दावाही यावेळी राज ठाकरे यांनी केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य राजन शिरोडकर, मनसेचे उपाध्यक्ष आनंद एंबडवार, मनसे महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रीटा गुप्ता, पश्चिम विदर्भ विभागीय संघटक विठ्ठल लोखंडकार, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर, मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष नवीन आचार्य, मनविसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष जसबीरसिंग बिडला, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, महिला आघाडीच्या अध्यक्ष ललिता चव्हाण, मनविसेचे जिल्हाध्यक्ष आनंद गडेकर, ज्ञानेश्वर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सायंकाळी वाशीममध्ये पोहोचले तेव्हा हजारो कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते वाशीममध्ये बुधवारी दुपार पासूनच दाखल झाले होते. चाहत्यांनी राज ठाकरे आगे बढोच्या गगनभेदी घोषणा देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. पक्षाच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे बुधवारी रात्री त्यांनी वाशिममध्येच मुक्काम केला. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे त्यांच्यासोबत होत्या. गुरुवारी सकाळी वाशीमवरून लोणार मार्गे बुलढाण्यासाठी ते रवाना झाले.