सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सरकारने मोठय़ा प्रमाणात विकासकामांना प्राधान्य दिले. त्यासाठी विविध माध्यमांतून निधीही उपलब्ध करून दिला. सरकारच्या निधीचा गैरवापर होऊ नये, यासाठी आपल्या भागातील विकासकामांचा दर्जा व गुणवत्तेकडे जनतेने लक्ष द्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.
जिंतूर तालुक्यातील मैनापुरी येथे तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत बांधण्यात येणारा सिमेंट रस्ता व राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना बुधवंत, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथराव जाधव, उज्ज्वला राठोड, पंचायत समिती सभापती लक्ष्मी जाधव, सदस्य वैष्णवी देशमुख, विजय भांबळे, स्वराज परिहार, उपसरपंच राजाभाऊ देशमुख आदी उपस्थित होते.
जिंतूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकास व पुंगळा येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामासाठी मंत्री सोळंके यांनी १ कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर केला. या सर्व कामांचे भूमिपूजन सोळंके यांच्या हस्ते शनिवारी झाले. सोळंके म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होत असतो. त्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देते. हा जनतेचा पैसा असल्यामुळे प्रशासन व संबंधित कंत्राटदाराकडून ही कामे चांगल्या दर्जाची करून घेण्याची मुख्य जबाबदारी गावकऱ्यांवर आहे.
जिंतूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा वेगळा आराखडा तयार करून या गावांत पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी या तालुक्याला विशेष निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाद बुधवंत यांनी प्रास्ताविक केले.