लहरी हवामानामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबईसारख्या परिसरात सध्या विचित्र तापाची साथ आली असून डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धसका घेणाऱ्या सर्वसामान्यांना या ‘साथीच्या’ तापाने सध्या त्रस्त केल्याचे चित्र दिसू लागले आहे. पाऊस जसा निरोप घेऊ लागतो तसे ‘व्हायरल’ तापाचे प्रमाण वाढते, असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यंदाचा हा ताप किमान सात दिवस तरी त्रास देतो, असा अनुभव या भागातील नामांकित डॉक्टरमंडळी व्यक्त करू लागली आहेत. या तापाच्या सोबत डोळ्यांचे तसेच पोटाचे विकारही बळावू लागले असून सर्दी तर पिच्छा सोडत नसल्याने अनेक जण हैराण झाले आहेत. सुरुवातीला पावसाने मारलेली दडी, त्यानंतर सुरू झालेला दमदार पाऊस आणि पुन्हा दडी, अशा बदलत्या ऋतुमानामुळे हा ताप बळावू लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तापासह सर्दी, खोकला या आजारांची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवली शहरामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दिवसाला सुमारे ५०० पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या सुमारे १०० ते १५० ने वाढली आहे. थंडी वाजून ताप, अंगदुखी, जुलाब, उलटय़ा, पोटदुखी यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून पाणी आणि हवेतून या आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात डोळ्यांची साथही बळावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या आजाराचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणांनी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप कमी असून डोळ्यांची साथही नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता ताप आणि डोळे येण्यासारखी कोणतीही साथ शहरात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. सेल्फ मेडिकेशन घातक सर्दी, खोकला यांसारख्या आजारांवर झटपट उपाय शोधण्याचा प्रकार सुरू झाला आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जाहिरातीच्या माध्यमातून तात्काळ बऱ्या करणाऱ्या गोळ्या, औषधांचा भडिमार लोकांवर होत असून त्यामुळे स्वत:च औषधांच्या दुकानातून औषधे खरेदी करून उपचार करून घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी लीलाधर म्हस्के यांनी वृत्तान्तला दिली. अशा प्रकारे सेल्फ मेडिकेशनचा हा प्रकार अत्यंत घातक असून डॉक्टरांच्या उपचारांनी दोन दिवसांमध्ये बरा होणारा आजार वाढण्याची शक्यता या प्रकारामुळे निर्माण होते. अनेक वेळा हा कालावधी वाढण्याची शक्यतासुद्धा निर्माण होते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे जाणवताच वैद्यकीय उपचार तात्काळ सुरू करून घेतल्यास यावर नियंत्रण येऊ शकते, असे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यात ‘साती’चा ताप..!
लहरी हवामानामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबईसारख्या परिसरात सध्या विचित्र तापाची साथ आली असून डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धसका घेणाऱ्या सर्वसामान्यांना या ‘साथीच्या’ तापाने सध्या त्रस्त केल्याचे चित्र दिसू लागले आहे.
First published on: 27-08-2014 at 06:52 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral fever in thane