सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा-मोहगाव शिवारात वाकाटक कालीन विटांनी बांधलेले शिवालय सापडलेले आहे. वाकाटकांचा काळ इ.स. २५० ते ५५०  दरम्यानचा आहे आणि पद्मपूर (आमगाव) ही वाकाटकांची राजधानी होती. वाकाटक नृपती हे शैववंशीय होते. त्यामुळे वाकाटक नृपतींनी बांधलेले हे शिवालय आहे, असे पुरातत्ववेत्यांचे मत आहे.
विदर्भातील ज्येष्ठ पुरातत्ववेत्ते डॉ. नरांजे यांनी हे शिवालय नुकतेच शोधून काढले. शेंडा-मोहगाव शिवारात प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत. २००४ साली येथील गणेश माहुले यांच्या शेतात खोदकाम करीत असतांना मोठे शिविलग सापडले. मागील आठवडय़ात डॉ. नरांजे यांनी शेंडा गावाला भेट देऊन हा प्राचीन वारसा शोधून काढला. येथे विटांचे प्राचीन मंदिर त्यांना आढळून आले. हे शिवालय आहे. मुळात याचा चौथरा ४ फूट उंच असावा. हा चौथरा ३४ से.मी. बाय ३४ से.मी. लांब चौकोनी विटावर हे शिविलग प्रस्थापित करण्यात आले आहे. हे बदामी रंगाचे चकचकीत गुळगुळीत शिविलग आहे आणि ते ५२ सेंटीमीटर उंच आहे. त्यावर ब्रह्मसूत्राचे अंकन आहे. प्राचीन मूर्ती शास्त्राप्रमाणे हे शिविलग गढविण्यात आले आहे. या भागात मिळणाऱ्या ग्रेनाईटच्या दगडातच ते घडविण्यात आले आहे. याच गावात ७५ से.मी. परिघाची १५०० वर्षांपूर्वीची विहीर सुद्धा आढळली. ही विहीर भाजलेल्या मातीच्या वर्तुळांनी बांधलेली आहे. अशा दोन विहिरी शेतांमध्ये होत्या, पण त्या गावकऱ्यांनी बुजविल्या. या विहिरीला पाणी अजूनही आहे. या गावातील ५० ते १०० एकरात वाकाटक कालीन वास्तूंचे अवशेष आढळून येतात. या ठिकाणी जर संशोधन झाले, तर प्राचीन इतिहासावर प्रकाश पडू शकतो. शेंडाजवळच डुग्गीपार येथे शशीकर्णाचे जे देऊळ आहे. ते वाकाटक कालीन शिवालय आहे. गोंदियाजवळील नागरा येथे असणारे शिवालयही वाटाकाट कालीनच आहे. शेंडा येथील शिवालयाच्या संशोधनाने वाकाटकांच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडला आहे. शेंडा हे गाव वाकाटक काळात लोकवस्तीचे गाव होते. ते भरभराटीला आलेले असावे. या प्राचीन वारसाची जोपासणा व्हावी, अशी अपेक्षा आहे