अंबरनाथ जवळील वडोल गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या वालधुनी नदीत घातक रसायन ओतून या भागातील १२५ रहिवाशांच्या जिवाला बाधा उत्पन्न करणाऱ्या एका टँकरचालक- मालकाला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. घातक रसायनांची वाहतूक करणारा एक टँकर उल्हासनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतला आहे. तो एका नगरसेवकाच्या मुलाचा असल्याने हे प्रकरण पोलीस कसे हाताळतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  
अटक करण्यात आलेले रमेश गुडरू, दीपक जैसवाल महाड (रायगड) येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात वडोल गावाजवळील वालधुनी नदीत पहाटेच्या वेळेत घातक रसायन ओतण्यात आले होते. या रसायनांचा पाण्याशी संयोग होऊन निर्माण झालेल्या विषारी वायूचा परिसरात राहणाऱ्या सुमारे १२५ नागरिकांना त्रास झाला होता. या घटनेमुळे शासन खडबडून जागे झाले होते. वापी, महाड, लोटे परिसरातील काही कंपन्या मालाचे उत्पादन केल्यानंतर तयार झालेल्या घातक रसायनावर प्रक्रिया करण्याचा खर्च टाळण्यासाठी हे घातक रसायन कल्याण परिसरातील वालधुनी नदीच्या पात्रात आणून सोडतात. गेल्या अनेक वर्षांपासून काही उद्योजक व टँकर चालकांचा हा धंदा सुरू आहे. ‘लोकसत्ता’ने हे गुपित उघड करताच, शासनाने अशा प्रकारची टँकर टोळी शोधून काढण्यासाठी कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका आयुक्तांची एक समिती स्थापन केली आहे.
वडोलजवळ घातक रसायने ओतणाऱ्या काही टँकरचालकांचे पत्ते पोलिसांनी शोधले होते. त्या आधारे पोलीस उपायुक्त वसंत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत सोनावणे, बाळकृष्ण वाघ यांनी गुड्डर, जैसवालला अटक केली. उल्हासनगर गुन्हे विभागाचे उत्तमराव तांगडे यांच्या पथकाने एक टँकर पकडला आहे. तो एका नगरसेवकाच्या मुलाचा असल्याने खळबळ उडाली आहे.