विविध कामांच्या निविदांना मंजुरी, तसेच जुलै ते डिसेंबर २०१२ च्या जमा-खर्चास मंजुरी हे मुद्दे ऐनवेळच्या विषयात घेतल्याने विरोधकांनी जि. प. स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. या विषयी आयुक्तांकडे अपील करणार असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले.
जि. प. सभागृहात मंगळवारी स्थायी समितीची बैठक झाली. सभेला विविध विभागप्रमुखच गैरहजर असल्याने सत्ताधारी जि. प. सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी नाराजी व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली. जि. प.च्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा सभेत गाजला. हिंगोलीतील जागेवर जि. प.चा ताबा आहे. जागा नावावर करून घेण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. जागा नावावर झाल्यानंतर अतिक्रमण काढले जाईल, असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे यांनी सांगितले.