सेतू कार्यालयांमधील अनागोंदीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. नायब तहसीलदार चंद्रकांत नलावडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
शाळा-महाविद्यालयांमधील प्रवेश आता सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची गरज पडणार आहे. सेतू कार्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची शब्दश: पिळवणूक केली जाते. सैनिक कल्याण निधीच्या पावत्या घेण्याची त्यांना जबरदस्ती केली जाते. या निधीला मनसेचा विरोध नाही, मात्र एका वेळी २५ रुपयांची एक पावती देणे योग्य असताना १०० रुपयांच्या किमान ४ पावत्या घेणे बंधनकारक केले जाते अशी तक्रार मनसेचे सुमित वर्मा, तसेच नीलेश गोंधळे, गिरीश रासकर, प्रिया मिसाळ, आनंद सुराणा आदी कार्यकर्त्यांनी केली.
सेतू कार्यालयांमधील विद्यार्थ्यांची वर्दळ वाढणार आहे हे लक्षात घेऊन आधीच त्यांच्याकडे चांगली व्यवस्था, पुरेसे कर्मचारी आहेत याची काळजी तहसील कार्यालयाने घ्यावी असे नायब तहसीलदारांना सांगण्यात आले. सैनिक कल्याण निधीच्या पावतीची सक्तीही बंद करण्यात यावी. तेथील अशा कारभाराबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला.